जळगाव लाईव्ह न्यूज : २५ फेब्रुवारी २०२३ : आपण सुंदर दिसावे, चार चौघांमध्ये उठून दिसावे, इतरांनी आपल्या सौंदर्यांचे कौतूक करावे, यासाठी महिलांकडून सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. आज बाजारपेठेत अनेक प्रकारची सौंदर्य प्रसाधने उपलब्ध आहेत. मात्र हलक्या प्रतीच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर केल्याने आपला चेहरा खराब होवू शकतो, साईड इफेक्ट किंवा अॅलर्जी होवू शकते, यामुळे महिला नामांकित कंपनीच्या सौंदर्य प्रसाधनांना पहिली पसंती देतात. मात्र येथेही महिलांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव येथे उघडकीस आला आहे.
महिलांनो जर तुम्ही ब्रॅंडेड सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असाल तर सावधान! कारण या सौंदर्य प्रसाधनांच्या वापरामुळे तुमचा चेहरा खराब होवू शकतो. याचं कारण म्हणजे, ब्रॅंडेड सौंदर्य प्रसाधनांच्या नावाखाली ड्युब्लीकेट सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्याचा प्रकार जळगाव येथे उघडकीस आला आहे. जळगाव शहरातील फुले मार्केटमधील व बळीराम पेठेतील दुकानात हिंदुस्तान युनिलिव्हरचे लॅक्मे कंपनीचे हुबेहूब लेबल व पॅकिंग करून बनावट मालाचा साठा करणार्या दुकानदाराविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सिंधी कॉलनीतील रहिवासी दुकानदार विपिन प्रताप वरयानी (वय ३३) यांची बळीराम पेठेतील साई प्लाझा व सेंट्रल फुले मार्केटमध्ये कॉस्मेटिकची दुकाने आहेत. या दोन्ही दुकानात वेगवेगळ्या बनावट व हलक्या दर्जाचा लॅक्मे कंपनीचे हुबेहूब लेबल व पॅकिंग करून रिमूवर क्रीमचा साठा केला असल्याची माहिती कंपनीचे मुंबई येथील फिल्ड ऑफिसर सिद्धेश सुभाष शिर्के यांना मिळाली. त्यावरून त्यांनी या दोन्ही दुकानांमध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी कंपनीच्या नावाने बनावट लेबल व पॅकिंग केलेला माल आढळून आला. याप्रकरणी सिद्धेश शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात कॉपीराईट क्टनुसार दुकानदार विपिन वरयानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.