..तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात फडकणारा तिरंगाही शरमेने खाली झुकेल ; सामानातून जोरदार प्रहार
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२२ । देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत असून ‘हर घर तिरंगा’ या संकल्पना सरकारच्या वतीने राबवण्यात येतेय. मात्र अश्यात आजच्या सामना अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून भाजपच्या घोटाळेबाजांना एक तर ‘क्लीन चिट’ मिळत आहे, नाहीतर हायकोर्टातून ‘दिलासा’ मिळत आहे. राजकीय विरोधकांच्या विरोधात खोटे पुरावे, खोटे गुन्हे निर्माण करायचे, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करायचा, पण स्वतःचे सगळे अपराध आणि घोटाळे ‘दिलाशा’च्या टोपीखाली झाकून ठेवायचे. श्री. मोदी यांचे ‘स्वच्छ भारत अभियान’ हेच असेल तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात फडकणारा तिरंगाही शरमेने खाली झुकेल आणि भंगारात गेलेली विक्रांत युद्धनौका, शेकडो हुतात्मेही तडफडत राहतील. देशाला फसविणारे ठोस पुरावे मागत आहेत! विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत या ‘दिलासा’ घोटाळय़ाचा मुखवटा फाडायलाच हवा. विरोधी पक्ष ते करील काय? असा सवालही सामना अग्रलेखातून विचारण्यात आला आहे.
राज्यात शिंदे-फडणवीस महामंडळाचे सरकार आल्यापासून दिलासा घोटाळय़ांची प्रकरणे वाढली आहेत. बुलेट ट्रेनप्रमाणे आता ‘दिलासा फास्ट ट्रेन’ सुरू करायला हवी. नामचीन सोमय्या बाप-बेटय़ांना म्हणे आय.एन.एस. विक्रांत आर्थिक घोटाळा प्रकरणात दिलासा दिला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, या बाप-बेटय़ांविरुद्ध विक्रांत घोटाळय़ातले ठोस पुरावे सापडत नाहीत. आता हे ठोस पुरावे म्हणजे नेमके काय? असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
फोन टॅपिंगचा गुन्हा रश्मी शुक्लांवरही दाखल आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या खंडणीखोरीचा तपास करणारी ‘एसआयटी’ शिंदे-फडणवीस सरकारने बरखास्त केली. नवनीत राणा यांचे लकडावालांशी असलेले कागदोपत्री आर्थिक व्यवहार ‘मनी लॉण्डरिंग’ प्रकरणातच मोडतात, पण केंद्रीय तपास यंत्रणा या ‘लॉण्ड्री’वाल्यांना साधे चौकशीलाही बोलवायला तयार नाहीत. ज्यांच्यावर खून, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी, आर्थिक घोटाळे व ईडीच्या चौकशा सुरू होत्या ते सर्व भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये घुसळून स्वच्छ झाले आहेत, पण यामुळे आझादीचा अमृत महोत्सव मात्र कलंकित आणि गढूळ झाला आहे. महाराष्ट्रात नवे सरकार आल्यापासून भाजपच्या घोटाळेबाजांना एक तर ‘क्लीन चिट’ मिळत आहे, नाहीतर हायकोर्टातून ‘दिलासा’ मिळत आहे.
सत्य, न्याय व लोक भावनांचा इतका अनादर कधीच झाला नव्हता. राजकीय विरोधकांच्या विरोधात खोटे पुरावे, खोटे गुन्हे निर्माण करायचे, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी तपास यंत्रणांचा दुरुपयोग करायचा, पण स्वतःचे सगळे अपराध आणि घोटाळे ‘दिलाशा’च्या टोपीखाली झाकून ठेवायचे. श्री. मोदी यांचे ‘स्वच्छ भारत अभियान’ हेच असेल तर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात फडकणारा तिरंगाही शरमेने खाली झुकेल आणि भंगारात गेलेली विक्रांत युद्धनौका, शेकडो हुतात्मेही तडफडत राहतील. देशाला फसविणारे ठोस पुरावे मागत आहेत! विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या ‘दिलासा’ घोटाळ्याचा मुखवटा फाडायलाच हवा विरोधीपक्ष ते करतील काय?