
शास्त्रज्ञांकडून थेट अंतराळ विज्ञानाचे धडे
जळगाव लाईव्ह न्यूज । भारताच्या अंतराळ संशोधनाचे जागतिक केंद्र असलेल्या बंगळुरू येथील इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क (ISTRAC) येथील समर्पण संस्था संचलित श्रीमती. एस. एल. चौधरी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच एक अभ्यास भेट दिली. एमएमजीईआयएस (MMGEIS) आणि समर्पण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थ्यांना इस्रोच्या सर्वोच्च शास्त्रज्ञांचे थेट मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष ऐतिहासिक ‘मिशन कंट्रोल हॉल’मध्ये बसण्याचा दुर्मिळ बहुमान मिळाला.
कार्यक्रमात इस्रोचे माजी अध्यक्ष (२०१५-२०१८) पद्मश्री ए. एस. किरण कुमार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ श्री. राघवेंद्र एम. आर. आणि ISTRAC चे श्री. शंकर मारस्वामी यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. डॉ. विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टीतून १९६९ मध्ये स्थापन झालेल्या इस्रोचा देदीप्यमान इतिहास, एसएलव्ही-३, उपग्रहांचा वर्कहॉर्स मानले जाणारे पीएसएलव्ही, महाकाय जीएसएलव्ही आणि भारताचे बाहुबली रॉकेट एलव्हीएम-३ यांच्या तांत्रिक क्षमतेची माहिती शास्त्रज्ञांनी सोप्या शब्दांत उलगडून दाखवली. याशिवाय भारताची आगामी मानवी अंतराळ मोहीम ‘गगनयान’ आणि २०३५ पर्यंत उभारले जाणारे ‘भारतीय अंतराळ स्थानक’ याविषयीची वैज्ञानिक सज्जता जाणून घेताना विद्यार्थी भारावून गेले.
मोहिमांचा थरार विद्यार्थ्यांच्या शब्दांत :
“डॉ. विक्रम साराभाईंनी पेरलेल्या विचारांतून एसएलव्ही-३ ते आजच्या ‘बाहुबली’ बाहुबली रॉकेट एलव्हीएम-३ आणि विश्वासू पीएसएलव्ही रॉकेटपर्यंतचा भारताचा प्रवास थक्क करणारा आहे. भारतीय बनावटीच्या प्रक्षेपकांची ताकद शास्त्रज्ञांकडून ऐकताना तंत्रज्ञानाची नवी दृष्टी मिळाली.” – राम पाटील (इ. ८ वी)
“एकाच मोहिमेत पीएसएलव्ही-सी३७ द्वारे) तब्बल १०४ उपग्रह अंतराळात सोपवून भारताने प्रस्थापित केलेला जागतिक विक्रम किती अचूक नियोजनातून साकारला गेला, हे प्रत्यक्ष समजून घेताना भारतीय असल्याचा प्रचंड अभिमान वाटला.” – रितेश महाजन (इ. ८ वी)
“जगातील कोणताही देश पोहोचू शकला नाही, त्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ‘चांद्रयान-३’चे यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून तिरंगा फडकवणारा भारत पहिला ठरला. हा ऐतिहासिक क्षण ज्या केंद्रातून नियंत्रित झाला, तिथे उभे राहणे हा माझ्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे.” – मनन सोळंके (इ. ९ वी)
“चंद्रावर पाण्याच्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या ‘चांद्रयान-१’ मोहिमेने जगाचे लक्ष भारताकडे वेधले. त्या अभूतपूर्व शोधाची मूळ संकल्पना प्रत्यक्ष जाणून घेणे माझ्यासाठी आयुष्यभराची प्रेरणा ठरली आहे.” – सिद्धेश बिचवे (इ. ९ वी)
“पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत पोहोचून इतिहास रचणाऱ्या ‘मंगळयान’ मोहिमेचे बारकावे समजून घेताना अंगावर शहारे आले. भारतीय शास्त्रज्ञांची निष्ठा आणि गणितीय अचूकता शब्दातीत आहे.” – ओजस सूर्यवंशी (इ. ९ वी)
ज्या मिशन कंट्रोल हॉलमध्ये बसून महान शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी भारताच्या ऐतिहासिक अंतराळ मोहिमा फत्ते केल्या, थेट त्याच सिस्टीम टेबल्स आणि खुर्च्यांवर विद्यार्थ्यांना बसण्याची सुवर्णसंधी मिळाली. आधुनिक भारताचे ‘ज्ञानाचे मंदिर’ अनुभवताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तर चेहऱ्यावर भविष्यातील संशोधक बनण्याचा आत्मविश्वास झळकत होता.विद्यार्थ्यांच्या पंखांना नवे बळ देणारी ही अविस्मरणीय संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्री. विनीत गोएंका, श्री. परेश चौधरी व एमएमजीईआयएस (MMGEIS) संपूर्ण टीम, तसेच समर्पण संस्थेचे श्री. राजेंद्र नन्नवरे आणि सौ. चेतना नन्नवरे यांचे सर्व स्तरातून मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.





