जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । देशभरात सध्या अग्निपथ योजनेविरुद्ध तरुण रस्त्यावर उतरले आहे. अग्निपथ योजनेमुळे भविष्यात सैन्य भरती होणार नाही. तरुणांना ४ वर्षच नोकरी दिल्यानंतर काढून टाकण्यात येणार असल्याने पुढे त्यांचे भवितव्य अधांतरी असेल. अशा कितीतरी अफवांवर जाळपोळ आणि आंदोलनाचे लोण पोहचले आहेत. बिहार, उत्तरप्रदेशात तरुण प्रचंड आक्रमक झाले असून प्रशासनाकडून त्यांना लगाम घालणे अवघड होऊन बसले आहे. मुळात अग्निपथ योजना काय आहे? योजनेचे फायदे कोणते याची माहितीच अनेकांना नसून केवळ अफवांवर विश्वास ठेवत एक एक राज्यात आंदोलन सुरु होत आहे. अग्निपथ योजनेवर टीका करण्याअगोदर किंवा आपले मत व्यक्त करण्याअगोदर आपल्याला अग्निपथ योजना काय आहे? योजनेचे फायदे कोणते याची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.
जाणून घ्या काय आहे अग्निपथ योजना?
केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी तीन दिवसापूर्वी सैन्यदलातील भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेची घोषणा केली. अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात चार वर्षांसाठी देशसेवा करता येणार आहे. चार वर्षांसाठी काम सेवा करणाऱ्या या सैनिकांना ‘अग्निवीर’ म्हटलं जाईल. योजनेत सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा १७.५ ते २१ अशी आहे. तरुणांनी विरोध सुरु केल्यावर शासनाने वयोमर्यादेत वाढ केली असून आता २३ वर्षापर्यंतच्या उमेदवारांना संधी मिळणार आहे. शैक्षणिक पात्रता १० वी आणि १२ वी आहे. चार वर्ष सेवा बजावताना सुरुवातीला तरुणांना ९ महिने प्रशिक्षण दिले जाणार आहे. योजनेच्या पहिल्या वर्षी ३० हजार पगार असून त्यात ९ हजार कपात केल्यानंतर २१ हजार हाती येणार आहे. दरवर्षी होणारी पगारवाढ लक्षात घेता चौथ्या वर्षी ४० हजार रुपये पगार मिळेल. पगारातून कपात होणाऱ्या रकमेइतकीच रक्कम सानुग्रह अनुदान म्हणून देखील जमा केली जाणार आहे. पुढील ३ महिन्यात हि भरती प्रक्रिया सुरु होणार असून देशभरातून मेरीट आधारित भरती केली जाणार आहे.
अग्निवीरांना वीरमरण आल्यास कुटुंबियांना मिळणार १ कोटींची मदत
अग्निपथ योजनेत भरती केल्या जाणाऱ्या अग्नीवीरांपैकी २५ टक्के उमेदवारांना पुढे लष्करी सेवेत सामावून घेतले जाणार आहे. त्यासाठी त्यांना पुन्हा ६ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. अग्निवीरांना प्रवास सवलत, भत्ते, रेशन, ड्रेस असे फायदे मिळणार आहे. सेवा समाप्तीनंतर प्रत्येकाच्या खात्यात किमान ११ लाख ७१ हजार रुपये जमा झालेले असणार आहेत. पुढे त्या अग्निवीरला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास बँक कर्ज मिळवण्यासाठी, इतर ठिकाणी नोकरीसाठी शासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत. देशासाठी सेवा बजावताना एखाद्या अग्निवीरला वीरमरण प्राप्त झाल्यास त्याच्या कुटुंबियांना विम्याची मदत दिली जाईल, तसंच कुटुंबाला एक कोटींची आर्थिक मदत आणि संपूर्ण सेवानिधी त्यांना दिला जाईल. सेवा बजावताना अपंगत्व आल्यास १५ लाख, २५ लाख आणि ४४ लाखापर्यंत भरपाई दिली जाणार आहे.
हे देखील वाचा : Agneepath Scheme : चुकीच्या मार्गाने विरोध करीत स्वतःचे भविष्य काळकुट्ट करणारी तरुणाई!
अफवांवर विश्वास ठेऊ नये – शासनाचे आवाहन
एका फेसबुक पोस्टमध्ये, पीआयबीने म्हटले आहे की, ही योजना सशस्त्र दलांमध्ये नवीन गतिशीलता आणेल. यामुळे सैन्याला नवीन क्षमता निर्माण करण्याची आणि तरुणांच्या नाविन्यपूर्ण विचारांचा फायदा घेण्याची संधी मिळेल. त्यामुळे तरुणांनाही देशसेवेची संधी मिळणार आहे. शासनाने स्पष्ट करताना सांगितले कि, योजनेमुळे लष्कराच्या रेजिमेंटल व्यवस्थेत कोणताही बदल केला जाणार नाही. पूर्वीप्रमाणेच व्यवस्था सुरू राहील त्यामुळे तरुणांनी काळजी करण्याची गरज नाही. योजना लष्कर आणि तरुणांसाठी फायदेशीर देखील आहे. विद्यमान आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांशी सखोल सल्लामसलत केल्यानंतर ही योजना आणण्यात आली. अग्निपथ योजनेला सुरु असलेला विरोध लक्षात घेता केंद्र सरकार आता योजनेचे फायदे काय आहेत हे पटवून देण्यासाठी सोशल मीडियाचा उपयोग करीत आहे. पीआयबी, ऑल इंडिया रेडिओच्या संकेतस्थळावरून योजनेचे फायदे, अफवा आणि सत्यता याबाबत सांगण्यात येत आहे.
अग्निवीरांना समाजासाठी धोका म्हणणे म्हणजे लष्कराचा अपमान
अग्निपथ योजनेतील सेवा समाप्त झाल्यावर समाजात बाहेर पडणारे तरुण पुन्हा बेरोजगार होतील. सैन्यातील प्रशिक्षण असल्याने ते समाजासाठी धोकेदायक ठरतील अशी भीती एका गटाने व्यक्त केली आहे. दरम्यान, अग्निवीरांना’ समाजासाठी धोका म्हणणे म्हणजे लष्कराचा अपमान आहे. ‘अग्निवीर’ समाजासाठी धोकादायक ठरू शकतो, असे सांगत सरकारी अधिकाऱ्यांनी ही टीका ठामपणे फेटाळून लावली आहे. अधिका-यांनी सांगितले की, अशी टिप्पणी म्हणजे सैन्याच्या नैतिकतेचा आणि मूल्यांचा अपमान आहे. आत्तापर्यंत हजारो लोक सैन्यातून निवृत्त झाले आहेत पण देशविरोधी शक्तींशी कोणी हात मिळवणी केल्याची उदाहरणे नाहीत, असेही ते म्हणाले.
उत्तरेकडील राज्यात तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण
अग्निपथ योजनेविरोधात अनेक राज्यांत मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. बिहार व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली-एनसीआरमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात निदर्शने झाली. बिहारच्या नवादामध्ये भाजपचे कार्यालयच जाळण्यात आले. आमदारांच्या गाडीच्या काचा फोडल्या. दुसरीकडे, छपराचे भाजप आमदार डॉ. सीएन गुप्ता यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आले. बिहारमध्ये नऊ तास अनेक मार्गांवर गाड्यांची वाहतूक बंद होती. छपरामध्ये सलून ट्रेनला आग लागली. पोलिसांनी सुमारे १५ राऊंड हवेत गोळीबार केला. आरा स्टेशन परिसरात दोन दुचाकी जाळून अनेक दुकानांची तोडफोड करण्यात आली. यादरम्यान १६ जणांना अटक करण्यासोबतच ५०० अनोळखी लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला. बक्सरच्या डुमराव स्थानकावर एसी स्पेशल ट्रेनचे नुकसान झाले. भागलपूर स्थानकाजवळ ट्रॅकचे नुकसान झाले. मोतिहारी स्थानकावर आणि बरौनीहून वांद्रेकडे जाणाऱ्या अवध एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आली, त्यात प्रवासी आणि जवान जखमी झाले. झारखंडमधील रांची येथील सैन्य भरती कार्यालयाबाहेर तरुणांचे आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे दिल्लीतील नांगलोई स्थानकावर तरुणांनी ट्रेन अडवली. पोलिसांनी आंदोलक तरुणांना समजावून सांगत ट्रॅकवरून हटवले. डेहराडूनपासून ते उत्तराखंडमधील पिथौरागढच्या सीमावर्ती जिल्ह्यापर्यंत युवकांनी निदर्शने केली. पिथौरागढमध्ये आंदोलकांनी दगडफेक केली, ज्यात काही जवान जखमी झाले.