जळगाव लाईव्ह न्युज । २९ एप्रिल २०२२। येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व कामकाज ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले आहे. यात आता आधार क्रमांकाचा वापर करुन ऑनलाईन पद्धतीने शिकाऊ अनुज्ञप्ती देणे बाबत १४ एप्रिल पासून अंमलबजावणी करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र नमुना क्रमांक १ मध्ये अहर्ता प्राप्त डॉक्टरांद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरून अपलोड करण्याची प्रक्रिया एनआयसी द्वारे विकसित करण्यात आली आहे.
वैद्यकीय प्रमाणपत्र हे केवळ एमबीबीएस पदवी धारण करणारे डॉक्टर्स देऊ शकतील. या प्रक्रियेमध्ये एमबीबीएस डॉक्टर यांनी कार्यालयाने दिलेल्या लिंक वर जाऊन रजिस्ट्रेशन मध्ये विहित नमुन्यातील सर्व माहिती भरावयाची असून स्वतःचे छायाचित्र व त्यांचे एमबीबीएस डिग्री मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्राची स्वयम् साक्षांकित प्रत अपलोड करायची आहे. यासाठी कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक व सहाय्य्क मोटार वाहन निरीक्षक यांनी प्रत्येकी या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पाच डॉक्टरची नोंदणी करण्यासाठी संबंधित डॉक्टर कडे जाऊन त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन बाबत माहिती देऊन अहवाल सादर करावा अशा आशयाचा आदेश प्रादेशिक परिवहन अधिकारी मुंबई मध्य यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे.