⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२४ । मुक्ताईनगर परिसर हा आदिशक्ती संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन पुनीत भूमी म्हणून सर्वदूर परिचित आहे त्यामुळे मुक्ताईनगर तालुका व परिसरात वैष्णव, वारकरी संप्रदायाचे पाईक असणाऱ्या वारकरी भाविक भक्तांची संख्या मोठी आहे.

हे वारकरी भाविक दरवर्षी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यासोबत पायी वारीने आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूर येथे जात असतात परंतु ज्यांना पालखी सोहळ्यासोबत पायीवारी करणे शक्य नाही असे वारकरी भाविक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसद्वारे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला नित्यनेमाने जात असतात.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मुक्ताईनगर ते पंढरपूर बस नियमित सोडण्यात येतात असेच आज बुधवार (१० जुलै) रोजी वारकरी भाविक भक्त पंढरपूर जाण्यासाठी मुक्ताईनगर बस स्थानका वर जमले होते; परंतु ऐनवेळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा तर्फे पंढरपूर जाण्यासाठी बस उपलब्ध नसल्याचे कारण सांगून मुक्ताईनगर ते पंढरपूर बस रद्द झाल्याचे वारकरी बांधवांना परिवहन महामंडळातर्फे सांगण्यात आले.

त्यामुळे पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाण्याची ओढ लागलेल्या वारकऱ्यांनी पंढरपूर जाण्यासाठी बस उपलब्ध व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींसोबत मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने वारकरी बांधवानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला. रोहिणी खडसे या पक्षाच्या कामानिमित्त मुंबईमध्ये होत्या. त्यांनी वारकरी बांधवांची अडचण जाणून घेतली व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाशी मोबाईलवरून संपर्क साधून वारकरी बांधवाना पंढरपूर जाण्यासाठी तात्काळ बस उपलब्ध करून देण्याविषयी सूचना केली. यावर अर्ध्या तासात पंढरपूर जाण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर आदिशक्ती मुक्ताई आणि पांडुरंगाच्या नावाचा जयघोष करत वारकऱ्यांना घेऊन बसने पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावर सर्व वारकरी बांधवानी रोहिणी खडसे यांच्या प्रति आभार व्यक्त करत, पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला मुक्ताईची लेक धावून आल्याची भावना व्यक्त केली.