जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२३ । एरंडोल शहरातील कंपनीत दोन वाहनातून आलेल्या पाच दरोडेखोरांनी रखवालादाराचे हातपाय बांधून कंपनीतून कॉईल व कॉपर चोरून नेल्याच्या गुन्ह्यातील तीन गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. यात वापरलेले एक वाहन जप्त केले आहे. पुढील कारवाईसाठी तिघांना एरंडोल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल शहरातील अंगारक ट्रान्सफार्मर कंपनीत १८ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री दोन वाहनातून आलेल्या पाच जणांनी रखवालदाराचे हातपाय बांधून कंपनीतून कॉईल व कॉपर चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्यात वापरलेले वाहन हे धुळे शहरात असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली.
त्यानुसार पथकाला कारवाईच्या सुचाना दिल्या. या पथकात पोलीस उपनिरीक्षक गणेश चोबे, अमोल देवडे, सहायक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजेश मेढे, संजय हिवरकर, अश्रफ शेख, महेश महाजन, अक्रम शेख, संदीप सावडे, दीपक पाटील, पोलीस नाईक, संतोष मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, राहुल बैसाणे, ईश्वर पाटील, लोकेश माळी, भरत पाटील, अशोक पाटील, मुरलीधर पाटील असे पथक धुळ्याला रवाना झाले. यातील धुळे शहरातून (एमएच १८ डब्ल्यू ८५१५) वाहन ताब्यात घेतले तर चालक इम्रान शेख रहीम शेख याला अटक केली. त्याची अधिक चौकशी केली असता इतर दोन गुन्हेगार हे औरंगाबाद जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पथकाने औरंगाबाद गाठत औरंगाबाद शहरातील भाजीपाला मार्केट मधून संशयित आरोपी वसीम खान सलार खान आणि शेख असत शेख फिरोज उर्फ सलमान या दोघांना ताब्यात घेतले. तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी तिघांना एरंडोल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नाना जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश आहेर करीत आहे.