⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

रस्त्यांचे अखेर ठरले : ४२ कोटीतून मुख्य रस्त्यांची कामे मार्गी लागणार, उर्वरित कामे वगळणार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ मे २०२२ । जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांची कामे ४२ कोटींच्या निधीतून करण्यात येणार होती. दरम्यान, निविदा मंजूर झाले तेव्हाच्या आणि आताच्या साहित्य दरात मोठी तफावत असल्याने आणखी निधी देण्याची मागणी मक्तेदाराने केली होती. गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह सत्ताधारी शिवसेनेचे पदाधिकारी यावर बैठका घेत होते. अखेर सोमवारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत ४२ कोटीत शक्य असतील ती मुख्य रस्त्यांची कामे अगोदर हाती घेण्यात यावी आणि उर्वरित तात्काळ आवश्यक नसलेली कामे वगळावी अशा सूचना ना.पाटील यांनी केल्या आहे.

अजिंठा विश्रामगृहात सोमवारी पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ४२ कोटींच्या कामासाठी बैठक घेण्यात आली. प्रसंगी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त विद्या गायकवाड, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, नगरसेवक मनोज चौधरी, गणेश सोनवणे, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, गजानन मालपुरे, मनपा अधिकारी, मक्तेदार प्रतिनिधी उपस्थित होते. ४२ कोटींच्या निविदेतील कामांना साधारणतः ४ वर्षापूर्वी मंजुरी मिळाली होती. कामे सुरु करण्यापूर्वी काही अडचणी आल्याने शासनाकडून स्थगिती देण्यात आली होती. कामावरील स्थगिती उठल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार होती.

जळगावातील रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता मुख्य रस्त्यांच्या कामाचा त्यात समावेश करण्यात आला होता. महागाई वाढल्याने निधी वाढवून मिळण्याची मागणी मक्तेदाराने केली होती. निधी वाढवून देण्यासाठी सर्व प्रक्रिया पुन्हा नव्याने करणे किंवा मनपा निधीतून निधी देणे असे दोन उपाय समोर होते. मनपा फंडातून निधी देणे शक्य नसल्याने आहे त्याच निधीत मुख्य रस्त्यांच्या कामाला सुरुवात करावी आणि जी कामे तूर्तास आवश्यक नसतील अशी कामे वगळण्यात यावी अशा सूचना करीत कामाला सुरुवात करण्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी सांगितले.