खाद्यतेलात तेजी ; सरकी सोबीनच्या दरात झाली वाढ
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२१ । देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. आधीच कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आल्याने सर्वसामान्य आर्थिक अडचणीत आले आहे. त्यात खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असून सोयाबीन आणि सरकीचे दर पुन्हा एकदा उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. सरकीचे क्विंटलचे भाव हे ४ हजारांपुढे तर सोयाबीनचे दर ७ हजारांवर गेले आहेत.
खाद्य तेलाच्या दरात सतत वाढ हाेत असताना दुसरीकडे तेलबियांच्या किंमतीही वाढल्या आहेत. देशात साेयाबीन आणि सरकीच्या तेलाची मागणी असते. यावर्षी साेयाबीन आणि कापसाच्या उत्पादनात घट झाली आहे. दाेन्ही पिकांचा हंगाम लवकर आटाेपल्याने बाजारपेठेत तेलबीयांचा पुरेसा साठा नाही. बाजारात तेल उद्याेगात तेलबीयांची मागणी असताना पुरेसा पुरवठा नसल्याने साेयाबीन आणि सरकी या दाेन्ही तेलबियांचे दर वाढले आहेत.
साेयाबीनचे दर ७२०० रूपयांवर गेले आहेत. गेल्या सहा महिन्यात ४ हजारांवरून साेयाबीनच्या दराने ७२०० रूपयांचा टप्पा गाठला आहे. दुसरीकडे हंगामाच्या सुरूवातीला २ हजार रूपयांपर्यंत असलेल्या सरकीचे दर देखील सध्या दुप्पट म्हणजे ४ हजार रूपये प्रतिक्विंटलपर्यंत पाेहचले आहेत. देशांतर्गत बाजारपेठेत तेलबीयांचे उत्पादन पुरेसे नसल्याने यंदा क्षेत्र वाढ होण्याचा अंदाज आहे.