जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑक्टोबर २०२१ । जळगाव महानगरपालिका हद्दीतील घरपट्टी करयोग्यमूल्य सुधारित मूल्यांकन कर रद्द करण्यात यावा, अशी मागणी धर्मरथ फाउंडेशनतर्फे मनपा प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
जळगाव महापालिका प्रशासनाकडून घरपट्टी प्रस्तावित करयोग्यमूल्य निर्धारणेचे विवरण संदर्भात शहरातील सर्व नागरिकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. त्यानुसार सन २०२१-२२ मध्ये अधिकचा कर मनपा प्रशासन नागरिकांकडून वसूल करणार आहे. त्यामध्ये तीन पट कर वसूल करणार आहे. त्यात सामान्य कर, अपेक्षित करयोग्यमूल्य आणि अपेक्षित वार्षिक भाडेमुल्यकर प्रत्यक्ष प्रमाणात वाढणार आहे. जळगाव शहराची परिस्थिती पाहता येथे नागरिकांना पायी चालायची सुद्धा सोय नाही. रोड, गटारी नाही. पावसाळ्यात रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी तुंबते. काही ठिकाणी तर स्ट्रीटलाइट सुद्धा नाही आणि कोरोना काळामध्ये नागरिकांचे आर्थिक नुकसान झालेले आहे ते पाहता आपण हा कर रद्द करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सध्यास्थितीमध्ये आम्ही जो कर भरत आहोत, ते बघता आम्हाला मागील दहा वर्षांमध्ये कुठलीच सुविधा उपलब्ध झालेली नाही. मग आम्ही हा कर का म्हणून भरावा. असा प्रश्नही निवेदनाद्वारे उपस्थित करण्यात आला आहे.
अन्यथा कर भरणार नाही…
आम्ही कर भरायला तयार आहोत, परंतु आम्हाला चांगल्या प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हायला हव्यात, अन्यथा आम्ही जो कर भरत आहोत, तो सुद्धा भरणार नाही, असा इशारा निवेदनद्वारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी धर्मरथ फाऊंडेशन अध्यक्ष विनायक पाटील, गणेश शेळके, अजय इंगोल, राजेंद्र सणस, वीरेंद्र हेबाडे, निशांत पाटील आदी उपस्थित होते.