⁠ 
रविवार, मे 19, 2024

जळगावसह महाराष्ट्रातून परतीचा पाऊस कधी जाणार? हवामान खात्याने वर्तविला ‘हा’ अंदाज

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ओक्टोबर २०२२ । महाराष्ट्रातील विविध भागात मागील अनेक दिवसापासून परतीचा पाऊस कोसळत आहे. काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात थांबलेला परतीचा पाऊस कधी जाणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. अशातच राज्यातून 20 ऑक्टोबरपर्यंत पाऊस पूर्णपणे माघार घेऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

शुक्रवारी परतीचा मान्सून उत्तर महाराष्ट्रात दाखल झाला आहे. येत्या तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी भागातून माघार घेईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील बहुतांश भागाला काल शुक्रवारी पावसाने झोडपले आहे. यामुळे  यामुळे हातातोंडाशी आलेली हजारो हेक्टरमधील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.

उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून मान्सून माघारी परतला आहे. बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील काही भागांतून मान्सूनने माघार घेतली आहे. मान्सून माघारची रेषा रक्सौल, डाल्टनगंज, पेंद्र रोड, छिंदवाडा, जळगाव, डहाणू भागांवरुन गेल्याचे दिसत आहे. पुढील २-३ दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागांतून मान्सून माघारची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

जाता जाता परतीच्या पावसाने संपूर्ण राज्यात धूमाकूळ घातला आहे. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाने खरीप पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. कापूस, सोयाबीन, भातपिकासह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. हातात आलेली पिके उद्ध्वस्त झाली असून, खरिपाचा बळीराजाच्या तोंडचा घास हिरावला जात आहे. पुढील काही दिवस परतीचा पाऊस उच्छाद मांडणार असल्याने शेतकर्‍यांची चिंता आणखी वाढली आहे.