पर्यावरण साहित्य संमेलनाच्या निवड फेरीस विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद !
जळगाव लाईव्ह न्यूज । 14 फेब्रुवारी 2024 । महाराष्ट्र राज्य साहित्य मंडळ पुरस्कृत आणि समर्पण संस्था संचालित पर्यावरण आणि निसर्ग संवर्धन शाळेतर्फे तिसरे पर्यावरण साहित्य संमेलन दि. २५ फेब्रुवारी रोजी कोल्हे नगर येथे आयोजीत करण्यात आले आहे. या अनुषंगाने १३ फेब्रुवारी मंगळवार रोजी पर्यावरण साहित्य संमेलनाची निवड फेरी पर्यावरण शाळा, कोल्हे नगर येथे संपन्न झाली. यात सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, अनुक्रमे श्रीमती एस. एल. चौधरी विद्यालय, शानबाग विद्यालय, बालनिकेतन विद्यालय, नवीन माधामिक विद्यालय, के.के इंटरनॅशनल स्कूल, ए. टी.झांबरे विद्यालय, रायसोनी कॉलेज, गोदावरी कॉलेज, लॉ कॉलेज इ. मधून विद्यार्थ्यांनी आपला उस्फुर्त सहभाग नोंदवला आहे. यात सर्व विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धन व पर्यावरण या विषयावर सुंदर कविता, कथाकथन आणि परिसंवाद इ. साहित्य प्रकार सादर केले. तसेच सौ. सविता भोळे, श्री विजय लुल्हे, प्रा. गोपीचंद धनगर, सौ. स्मीता चव्हाण, सौ. पूजा पाटील, सौ. नयना पाटील, सौ. अर्चना पाटील, सौ. अर्चना सनेर व श्रीमती राजश्री भोई यांनी विद्यार्थ्यांचे परीक्षण केले.
या राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलनाचे उद्घाटन प्रा. सुचित्रा लोंढे यांनी केले. या प्रसंगी त्यांनी पर्यावरण संरक्षणाची गरज आणि त्यामध्ये निसर्गावरील लेखन वाढले पाहिजे, तेसे या लेखनाची आवड निर्माण होऊन निसर्गावरील साहित्य वाचनाची चळवळ निर्माण झाली पाहिजे अशी भूमिका विषद करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अर्चना उजागरे यांनी केले.
संमेलनास पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पर्यावरण आणि बाल साहित्यिका श्रीमती केटी बागली यांची निवड करण्यात आली आहे यामध्ये त्यांची प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे. पर्यावरण आणि निसर्ग संवर्धनावर आधारित कथाकथन आणि कवी संमेलनाचा कार्यक्रमही शालेय तसेच महविद्यालयीन स्तरावर विद्यार्थी करणार आहेत. या राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलन दि. २५ फेब्रुवारी २०२४ रोजी समर्पण संस्था संचलित पर्यावरण शाळा, कोल्हे नगर येथे आयोजित करण्यात आले आहे.