⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

भांडण सोडविणे पडले महागात; तरुणाला लोखंडी पाईपने केली मारहाण

जळगाव लाईव्ह न्यूज। ३१ जुलै २०२३। भुसावळ शहरातील पापा नगरात सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला चार जणांनी लोखंडी पाईपने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याचप्रमाणे जीवेठार मारण्याची धमकी देखील दिली. याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शेख शाहरूख शेख सलीम (वय-२८) रा. मित्तलनगर, पटेल कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २२ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास भुसावळातील पापा नगरात काहींचे भांडण सुरू होते. त्यावेळी शेख शाहरूख हा भांडण सोडविण्यासाठी गेला. याचा राग आल्याने वसीम मजिद पटेल, सलमान मजिद पटेल दोन्ही रा. पटेल कॉलनी, फिरोज शेख आणि इकबाल शेख दोन्ही रा. पापा नगर, भुसावळ यांनी लोखंडी रॉड शेख शाहरूख याच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली.

ही घटना घडल्यानंतर जखमी तरूणाला शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी २९ जुलै रोजी दुपारी ४ वाजता शेख शाहरूख याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी वसीम मजिद पटेल, सलमान मजिद पटेल दोन्ही रा. पटेल कॉलनी, फिरोज शेख आणि इकबाल शेख दोन्ही रा. पापा नगर, भुसावळ या चौघांविरोधात बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश चौधरी करीत आहे.