दहा रुपयाचा रिचार्ज पडला ५० हजार रुपयात, नेमकं काय घडलं?
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२२ । मुक्ताईनगर येथील वनविभागात कर्मचारी असलेल्या ३४ वर्षीय महिलेला मोबाईलवर मेसेज पाठवून दहा रुपयांचा रीजार्ज करा, असे संदेश पाठवून भामट्याने 50 हजारांचा गंडा घातल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वैशाली अनिल कुलकर्णी (34, पंचायत समिती कार्यालयामागे, मुक्ताईनगर) यांनी पोलिसांत तक्रार दिली. वैशाली या ऑनलाईनद्वारे वीज कंपनीचे बिल भरत असताना त्यांनी एका क्रमांकावर संपर्क साधला. दरम्यान, समोरील व्यक्तीने त्यांना एक लिंक पाठवून दहा रुपयांचा रीचार्ज करा, असे सांगण्यात आले. संभाषण सुरू असताना कुलकर्णी यांनी लिंकवर क्लिक करताच सदर महिलेच्या स्टेट बँक शाखेतून 50 हजार 50 रुपयांची कपात झाली. हा प्रकार शुक्रवारी सकाळी पावणे दहा वाजता घडला.
या प्रकरणी सदर महिलेने मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास प्रभारी निरीक्षक राजेंद्र गुंजाळ करीत आहेत.