जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२५ । भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाला पूर्णविराम मिळाल्यांनतर आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने ऐतिहासिक झेप घेतली होती. सोमवारी (१२ मे) सेन्सेक्स 2975 अंकांनी वाढून 82,429.90 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 916.70 अंकांनी वाढून 24,924.70 अंकांवर बंद झाला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजेच आज (दि १३) बाजारात मोठी पडझड पाहायला मिळाली. सुरुवातीच्या सपाट सुरुवातीनंतर शेअर बाजार कोसळला. काही वेळातच शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्स 1200 अंकांनी खाली आला. तर निफ्टी 300 अंकानी खाली आला.

जागतिक बाजारांकडून मिळालेल्या सकारात्मक संकेतांनंतरही, भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क निर्देशांक निफ्टी-50 आणि बीएसई सेन्सेक्स मंगळवारी (13 मे) मोठ्या घसरणीसह बंद झाले. आज सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 1281 अंकांनी घसरून 81,148 वर बंद झाला. तर निफ्टी 346 अंकांनी घसरून 24,578 वर बंद झाला.
आज पीएसयू बँक आणि फार्मा निर्देशांक 1 टक्क्यांहून अधिक वाढीसह बंद झाले. तर आयटी, एफएमसीजी आणि रिअल्टी निर्देशांक घसरले. निफ्टीमध्ये पॉवर ग्रिड कॉर्प, इन्फोसिस, इटरनल, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज हे सर्वाधिक घसरले होते. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स, जिओ फायनान्शियल, हिरो मोटोकॉर्प, डॉ. रेड्डीज लॅब्स आणि सिप्ला हे निफ्टीचे सर्वाधिक वाढणारे शेअर होते.
प्रॉफिट बुकिंग
सोमवारच्या तेजीनंतर आज मंगळवार 13 मे रोजी शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केले. हे आजच्या घसरणीचे मुख्य कारण होते. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की कालच्या मोठ्या तेजीत बाजारात अशी प्रॉफिट बुकिंग होणे सामान्य आहे. दरम्यान, आज अस्थिरता निर्देशांक जवळजवळ स्थिर राहिला, ज्यामुळे या घसरणीमागे कोणतीही पॅनिक विक्री नसल्याचे दिसून येते.
आयटी शेअर्समध्ये घसरण
सोमवारी अमेरिका-चीन व्यापार करारामुळे आयटी क्षेत्रात जोरदार खरेदी दिसून आली. निफ्टी आयटी निर्देशांकाने गेल्या 5 वर्षातील सर्वात मोठी उडी घेतली. पण आज निफ्टी आयटी निर्देशांक एक टक्क्यांहून अधिक घसरला. तज्ञांचे म्हणणे आहे की ही घसरण कोणत्याही मोठ्या ट्रेंड बदलाचे संकेत देत नाही तर ती अल्पकालीन प्रॉफिट बुकिंग आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार डॉ. व्ही.के. विजयकुमार म्हणाले, “अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ कमी करण्याचा करार हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक सकारात्मक संकेत आहे. यामुळे भारतीय आयटी कंपन्यांना फायदा होऊ शकतो.”
3. जागतिक दबाव आणि अनिश्चितता
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, अमेरिकन डॉलर (DXY निर्देशांक) ची वाढ आणि काही प्रमाणात भू-राजकीय तणाव यांचाही आज शेअर बाजाराच्या भावनांवर नकारात्मक परिणाम झाला. याशिवाय भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे.परंतु असे असूनही, सीमेवर ड्रोन आणि शोपियानमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीच्या बातम्या समोर आल्या आहेत. दरम्यान, अमेरिकन डाउ जोन्स फ्युचर्स देखील भारतीय वेळेनुसार किरकोळ घसरणीसह व्यवहार करत होते. या कारणांमुळे गुंतवणूकदार सावध झाले.