⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

खरी शिवसेना आमचीच ; मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२२ । एकनाथ शिंदेसह शिवसेनेच्या ४० आमदारांच्या बडखोरीमुळे गेली अडीच वर्ष सत्तेत असलेल ठाकरे सरकार कोसळलं. त्यानतंर शिंदे गट आणि भाजपने एकत्र येत नवीन सरकार स्थापन केलं असून त्यात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. आता खरी शिवसेना कोणाची यावरून संघर्ष सुरू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाने आमच्याकडे बहुमत आहे. ४० आमदार आहेत, असं म्हणत खरी शिवसेना आमचीच आहे, असा दावा केला आहे. आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीही एक वक्तव्य केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेतून फुटलेला एकनाथ शिंदे गट आपलीच खरी शिवसेना असल्याचे दावे करत आहेत. यावरून शिवसेना वाद पाहायला मिळत आहे. अशातच शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील ह्यांनी कालच मोठा दावा केला होता. विधिमंडळात बहुमत असल्याने खरी शिवसेना आमचीच आहे. धनुष्यबाण चिन्हासाठी पुढील लढाई न्यायालयात असेल, असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलंय.

यावर आता बंडखोर आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना आमचीच आहे. उद्धव साहेबांचीच शिवसेना आहे, बाळासाहेबांचीच शिवसेना आहे. फक्त आमच्यात जो असंतोष होता घटक पक्षांबाबत तो आम्ही स्पष्ट केलेला आहे. धनुष्यबाणाच्या चिन्हाची लढाई, तर वरिष्ठ स्तरावर जो निर्णय होईल, तो आम्हाला मान्य असेल, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्येच एक वाक्यता नसल्याची चर्चा आहे.

आता एकनाथ शिंदे गटातील सहभागी आमदारांची शिवसेना कोणाची यावरून वेगवेगळे मत असल्याने आगामी काळात यावरून काय राजकीय घडामोडी घडतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.