⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

बऱ्याच दिवसांनी RBI ने सर्वसामान्यांना दिली गुडन्यूज : तुमचा EMI वाढणार की कमी होणार?

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२३ । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) काही काळापासून सातत्याने वाढणाऱ्या व्याजदरावर लोकांना दिलासा दिला आहे. आरबीआयकडून नवीनतम आर्थिक धोरण जाहीर करण्यात आलं असून यात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयकडून रेपो रेट ६.५ टक्के इतकाच कायम ठेवण्यात आला आहे.

द्विमासिक चलनविषयक धोरणाचा आढावा सादर करताना, RBI गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की, अमेरिकेतील बँकांच्या अपयशामुळे आर्थिक संकट कायम आहे. चलनविषयक धोरण समितीच्या (एमपीसी) तीन दिवसीय बैठकीचे निकाल आज आले.

चलनविषयक धोरण समितीने एकमताने रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थव्यवस्थेचा विकास सुरू ठेवण्यासाठी रेपो दर पूर्वीच्या पातळीवर कायम ठेवण्यात आला आहे. गरज पडल्यास परिस्थितीनुसार पावले उचलू, असेही ते म्हणाले. आरबीआय गव्हर्नर म्हणाले की बँकिंग आणि एनबीएफसी वित्तीय प्रणाली मजबूत आहे.

दरम्यान, महागाईचा दर न वाढल्यामुळे मे २०२२ पासून सुरू झालेली व्याजदर वाढीची प्रक्रिया थांबली आहे. मे 2022 पासून मध्यवर्ती बँकेने रेपो दरात 2.5 टक्क्यांनी वाढ केली आहे. यादरम्यान रेपो दर ४ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या ते चार वर्षांच्या सर्वोच्च पातळीवर चालू आहे.

सर्वात जास्त दिलासा कोणाला मिळाला?
विविध बँकांकडून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना रेपो दर पूर्वीच्या स्तरावर कायम ठेवण्याचा जास्तीत जास्त फायदा मिळेल. सध्या बँकांकडून कोणत्याही प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात वाढ होण्याची आशा नाही. रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात वाढ केली, तर त्याचा परिणाम बँकांच्या व्याजदरावर होणार हे नक्की. त्यामुळे गृहकर्जाची परतफेड करणाऱ्या ग्राहकांचा हप्ता वाढला असता.

रेपो दर म्हणजे काय?
RBI कडून बँकांना ज्या दराने कर्ज दिले जाते त्याला रेपो दर म्हणतात. रेपो रेट वाढल्याने बँकांना आरबीआयकडून महागड्या दराने कर्ज मिळेल. यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्ज इत्यादींचे व्याजदर वाढतील, ज्याचा थेट परिणाम तुमच्या EMI वर होईल.