जळगाव लाईव्ह न्यूज : २३ सप्टेंबर २०२३ : शहरातील उद्योग-व्यावसायिकांसाठी कार्यरत असलेल्या ‘जिंदा’ अर्थात ‘जळगाव इंडस्ट्रीयल असोसिएशन’च्या अध्यक्षपदी प्रथितयश उद्योजक रवींद्र लढ्ढा यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. ‘जिंदा’चे संस्थापक अध्यक्ष रजनीकांत कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात ही निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थित सदस्य उद्योजकांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
38 वर्षे जुनी संस्था असलेल्या ‘जिंदा’ची बैठक नुकतीच झाली. त्यात ही निवड झाली. याशिवाय उपाध्यक्षपदी उद्योजक आदर्श रजनीकांत कोठारी आणि सचिन नगीनचंद चोरडिया यांची निवड करण्यात आली. तसेच कार्याध्यक्षपदी विनोद बियाणी व संचालक म्हणून किरण राणे यांची निवड झाली. उर्वरित कार्यकारिणी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
विविध संघटनांचे अध्यक्ष ‘जिंदा’वर
शहरातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या विविध संघटनांचे अध्यक्ष हे ‘जिंदा’च्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून असतील, असे नूतन अध्यक्ष रवींद्र लढ्ढा यांनी सांगितले. जळगाव शहरातील औद्योगिक वसाहतीला विकसित करण्याचा आपला प्रयत्न राहील. शासन आणि औद्योगिक वसाहत यांच्यामधील दुवा म्हणून सर्व मिळून चांगले काम करू या, अशी प्रतिक्रिया ‘जिंदा’चे नूतन अध्यक्ष रवींद्र लढ्ढा यांनी व्यक्त केली आहे.