जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑक्टोबर २०२३ । आज मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेमध्ये पार पडली असून यावेळी दिवाळीसाठी राज्यातील शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, याआधी आनंदाच्या शिधामध्ये पाच वस्तूंचा समावेश होता. मात्र आता आनंदाच्या शिधामध्ये दोन वस्तूंचा समावेश करण्यात आला असून यामुळे आता एकूण सात वस्तू राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे.
100 रुपयांत मिळणाऱ्या आनंदाच्या शिधामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल या वस्तूंचा समावेश आहे. पण आता यामध्ये मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. मागच्या वर्षी दिवाळीपासून राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा देण्याची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर हा शिधा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त देखील देण्यात आला. त्याशिवाय गणेशोत्सवानिमित्त देखील आनंदाच्या शिधाचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे आता या शिधामध्ये दोन जिन्नसे वाढवून राज्य सरकारडून सामान्य माणसाला आनंद देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
आजच्या मंत्रिमंडळात घेण्यात आलेले अन्य निर्णय…
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा. मैदा आणि पोह्याचा देखील समावेश.
विदर्भ, मराठवाड्यातील कृषीपंप वीज जोडण्या वेगाने पूर्ण करणार. उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला मुदतवाढ.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना. दरवर्षी २७ विद्यार्थ्यांना मिळणार लाभ.
नागपूरला पाच अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन करणार. ४५ पदांनाही मंजुरी.
इमारतींच्या पुनर्विकासाला वेग येणार. विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबतअधिनियमात सुधारणा.
गारगोटी येथील तंत्रनिकेतनच्या विना अनुदानित शाखांना ९० टक्के शासन अनुदान