नायगांव येथे रास्ता रोको आंदोलन
जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । रावेर,अंतुर्ली,मुक्ताईनगर या प्रमुख बाजारपेठांना जोडणाऱ्या मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे नायगांव येथील अपुर्णावस्थेत रखडलेल्या नवीन काॅक्रीटीकरण रस्त्याचे बंद असलेले काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, यासाठी बहुजन मुक्ती मोर्च्याच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी येत्या पाच दिवसात कामाला सुरुवात करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
तालुक्यातील मौजे नायगांव येथील रस्त्यावर राज्यतंर्गत काॅक्रिटकरण रस्त्याचे काम करण्यात येत असुन, आतापर्यंत एका साईडने करण्यात आले आहे. मात्र, एक साईड अपुर्णावस्थेत असल्याने रहदारीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे. परीसरात हा एकमेव रस्ता असल्याने शेतकरी यांच्या केळी मालाच्या गाड्या व इतर वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच रस्त्याच्या ढाप्याला लोखंडी सळया उघड्या असल्याने अनेक अपघात होऊन अनेकांना दुखापती झाल्या. पर्यायी दुसरा रस्ता नसल्याने या रस्त्यावरुन एकतर्फी वाहतुक चालत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. ठेकेदाराने सदर रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करावे, यासाठी बुधवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी बहुजन मुक्ती पार्टि जिल्हा समन्वक प्रमोद पोहेकर,भारत मुक्ती मोर्चा प्रभारी नितीन गाढे, अजय इंगळे, किरण पोहेकर, बापु पाटील, अजय महाजन, सचिन महाजन, संजय म्हसाणे, राजु कोळी, राजेश ढगे, बंडु मराठे, राजु मराठे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.