भाजपला पुन्हा झटका; खा.रक्षा खडसे, स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद, राष्ट्रवादीचे दोघे बिनविरोध?
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ ऑक्टोबर २०२१ । जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला राष्ट्रवादीकडून धक्क्यावर धक्के दिले जात आहे. ३ उमेदवार बिनविरोध केल्यानंतर खासदार रक्षा खडसे, विधानपरिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ यांचे उमेदवारी अर्ज बाद झाले असल्याची चर्चा असून आज त्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. खा.रक्षा खडसेंनी महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता. तर, स्मिता वाघ यांनी अमळनेर विकास सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता.
एकनाथराव खडसेंसह तिघे बिनविरोध ?
मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे व त्यांच्या कन्या ऍड.रोहिणी खडसे यांचेच अर्ज उरले आहेत. त्यामुळे ऍड.रोहिणी खडसे अर्ज मागे घेण्याची शक्यता असून एकनाथराव खडसे यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. त्यानंतर ऍड.रोहिणी खडसे महिला राखीव मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. अमळनेरमधून स्मिता वाघ यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.अनिल भाईदास पाटील हे बिनविरोध निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भुसावळ विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा अर्ज बाद झाला आहे. त्याठिकाणी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे रमण भोळेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.