⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

एका कलावंताचा मुद्राराक्षसाने बळी घेतला : राज्य नाट्य स्पर्धेतील एक गोष्ट भाग १

जळगाव लाईव्ह न्यूज । योगेश शुक्ल । वेळ आहे 32 व्या राज्य नाट्य स्पर्धेची. आमच्या संस्थेतर्फे रंग उमलत्या मनाचे हे नाटक सादर व्हायचे होते. त्यात काम करणारे आमचे एक काका होते. जुन्या पिढीचा कलावंत, पाठांतर चोख, आखीव रेखीव हालचाली. त्यांच्या अगदी स्टेजवरील जागांवर, वस्तूंवर देखील संवाद पाठ असत. मात्र नाटकाचा प्रयोग हा प्रयोग का म्हटला जातो तर तो रोज नवीन असतो. राज्य नाट्य स्पर्धेला अखेरच्या दिवशी या नाटकाचा प्रयोग होता. बालगंधर्वला प्रयोग सुरु झाला. पण समोरच्या नवख्या कलावंताने एक मुव्ह चुकीची घेतली आणि काकांचे थोडे गणित बिघडले. दोन क्षणांसाठी ते ब्लँक झाले पण प्रसंगावधान राखून पुढे काम सुरु केले.

प्रयोग रंगत गेला. प्रयोगानंतर साहजिकच अभिनंदन वगैरे सोपस्कार आटोपले. त्यावेळेस फार ठराविक वर्तमानपत्रातून समीक्षण प्रसिध्द व्हायची. नाटकाची फारशी माहिती नसणारे लोकसुध्दा केवळ वर्तमानपत्रात काम करतात म्हणून नाट्यसमीक्षण लिहायचे. ते दोन क्षण थांबणे काकांना महागात पडले. एका मान्यवर वर्तमानपत्रातील समीक्षकाने एक ओळ खरडली की, काकांचे पाठांतर नव्हते. ते वाचल्यानंतर काकांनी ठरवले की, आयुष्यात नाटकात काम करणार नाही. आणि खरोखर त्यानंतर त्या माणसाने नाटकात काम केले नाही. समीक्षणातील एका ओळीने जळगावच्या रंगभूमीने एक चांगला अभिनेता गमावला.

ही खरोखर काकांची चूक की समीक्षकाची. समीक्षक त्याच्या असलेल्या वकुब व ज्ञानानुसार बरोबर होता. म्हणजे मग चूक काकांचीच, त्यांनी त्या वर्तमानपत्राच्या कात्रणाला महत्व द्यायला नको होते आणि पुढेही काम करायला पाहिजे होते. पण यात आपल्या कोणाच्याच एक गोष्ट लक्षात येत नाही की, वर्तमानपत्रात छापून आलेले सगळेच खरे असते असा समज असणारा खूप मोठा वर्ग आहे. त्यांनी फोन करुन, भेटून, समोर आल्यावर काकांना अरे, यासाठीच का दोन महिने वाया घालवलेस, काम करता येत नाही तर का करतोस असे बोलून त्यांना वैतागून सोडले. संध्याकाळपर्यंत काकांनी नाटकात यापुढे कधीही काम न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एका कलावंताचा मुद्राराक्षसाने बळी घेतला.

प्रामाणिक समीक्षण, हौशी समीक्षण, परखड समीक्षण, विश्‍वासार्ह समीक्षण अशी काहीशी चर्चा रंगली होती. पण आपण व्यावसायिक नाटकाचे नाही तर हौशी नाटकाचे समीक्षण करतो आहोत. याचे भान बाळगून राज्य नाट्य स्पर्धेला समीक्षण लिहावे लागते. एकदा एका चर्चेत एका विद्वानांनी समीक्षकांची विश्‍वासार्हता यावर प्रश्‍नचिन्ह उभे केले. काय आहे समीक्षकांची विश्‍वासार्हता. मुळात ज्यांनी नाटक पाहिले ते समीक्षण किती वाचतात. समीक्षणाचा उद्देश केवळ नाटकातील चुका सांगणे हा नसून, नाटकाची बलस्थाने सांगणे हा देखील आहे. त्यासाठी नाटकात काम करणारा तानसेनच समीक्षण करेल असेही नाही एक चांगला कानसेनदेखील समीक्षण करु शकतो. पण शक्यतो आपल्या एखाद्या ओळीने किंवा शब्दाने एखाद्या अभिनेत्याचा बळी जाऊ नये, असे वाटते. त्यासाठी हा प्रपंच. बाकी असो.
(क्रमशः)

– योगेश शुक्ल
आर्ट डिपार्टमेंट हेड,
मृदंग इंडिया असोसिएटस्‌
मोबाईल – ९६५७७०१७९२