जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२५ । आजही अनेकांना प्रश्न पडतो, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येतील का? मराठी माणसांच्या हितासाठी या दोन बंधुंनी एकत्र यावं, अशी अनेकांची इच्छा आहे. यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकत्याच महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये युतीसाठी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला असल्याचं म्हटलं असून यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे.

अभिनेते महेश मांजरेकर घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंना प्रश्न विचारला. भविष्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती होऊ शकते का? तुम्ही एकत्र येऊ शकता का? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की,महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी एकत्र येण्यामध्ये काहीच चुकीचे नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंना राज ठाकरे यांनी युतीचा प्रस्ताव पाठवला आहे.
आमच्यातील वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे, त्यासाठी एकत्र यायला हरकत नाही, असे राज ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले आहे. एकत्र येणं, एकत्र राहणं, यात कठीण गोष्ट आहे, असं मला वाटत नाही. पण विषय फक्त इच्छेचा आहे. माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा विषय नाही. आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेच आहे. मी ते पाहतो आहे” असं राज ठाकरे उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर म्हणाले. आता यावर उद्धव ठाकरेंकडून काय प्रतिक्रिया येतेय, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.