⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून मांडल्या महिलांच्या व्यथा

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । स्त्री-भ्रूणहत्या, मुलगा व मुलीमध्ये घरात आणि समाजात होणार भेद, स्त्री अत्याचाराच्या घटना, महिलांची होणारी घुसमट आदींचे वास्तवरूपी चित्र विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मांडले. रायसोनी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वास्तविक दर्शनाने उपस्थितांची मने जिंकून घेतली.

रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी पहिल्या दिनी महिला सक्षमीकरणावर विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. कुटुंब आणि समाजात वावरताना महिलांनाच प्रत्येक ठिकाणी माघार घ्यावी लागते. मात्र, प्रत्येकवेळी महिलांनीच माघार का घ्यावी. त्यांचे स्वतंत्र अस्तित्व असून, त्यांची होणारी घुसमट दूर व्हावी. याच विषयाला अनुसरून विद्यार्थिनींनी ‘क्‍यो करे हम कॉम्परमाईज’ हे पथनाट्य सादर केले. विद्यार्थिनींनी सुरुवातीला महाविद्यालयाच्या परिसरात पथनाट्य सादर केले. या वेळी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा उपस्थित होते. महिला सक्षमीकरणाच्या विषयावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या उत्कृष्ट पथनाट्याचे प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी कौतुक केले व महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजातील सर्वच स्तरापर्यंत पोहोचावा, मुलगा व मुलीमध्ये भेदभाव करू नका, मुलींना सन्मानाने वागवा, महिलांचा आदर करण्याचा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

पथनाट्यामध्ये मानसी जगताप, वैष्णवी महाजन, तोशिता नेहते, काजल तायडे, संजना पुराणिक, रोशनी वाणी, हर्षदा सपकाळे, जागृती ठोसरे, दर्शना राणे, निकिता राठोड, चेतना बाविस्कर, अविनाश जोशी, दर्शन जोशी, शहीद अहमद, तुषार सपकाळ, अजय सैंदाणे, सुर्यकांत कंधारे, सचिन चव्हाण, चेतन बडगुजर, प्रवीण वाल्मिक यांचा समावेश होता. तसेच यानंतर महाविद्यालयातील महिला प्राध्यापिकांसाठी मनोरंजनाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या आयोजनासाठी विद्युत विभागप्रमुख प्रा. बिपासा पात्रा, एचआर गणेश पाटील, प्रा. मनीष महाले, मयुरी गजके व प्रिया टेकवाणी यांनी सहकार्य केले. तसेच सदर कार्यक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इंस्टीट्यूटचे संचालक प्रीतमजी रायसोनी यांनी कौतुक केले.