जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२२ । जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. पाचोरा तालुक्यातील बाळद परिसरात संततधार पावसामुळे तितूर नदीच्या पुलाशेजारी करण्यात आलेला मातीचा भराव वाहून गेला. यामुळे दहा गावांच्या रहदारीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच चोपडाई येथे विजेचा शॉक लागून तीन बकऱ्या ठार झाल्या तर पाळधी येथे दोन बैल व एक गायही ठार झाली आहे. रेल येथे घरांचे छत कोसळून दोघे जखमी झाले आहेत.
यंदाचा पावसाळा लवकर येणार असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात पाऊस उशिरा आला. जिल्ह्यावर तर दुबार पेरणीचे संकट येऊन ठेपले होते. पावसासाठी आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. वादळीवाऱ्यासह सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वृक्ष देखील कोलमडून पडले आहेत. पाचोरा, अमळनेर तालुक्याला तर पावसाने चांगलेच झोडपले आहे.
अमळनेर तालुक्यात शनिवारी व रविवारी असे दोन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. शहरात पिंपळे रस्त्यावर पाणी साचले तर चोपडाई येथे विजेचा शॉक लागून तीन बकऱ्या ठार झाल्या आहेत. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. चोपडाई येथे नामदेव राजाराम पाटील यांच्या मालकीच्या या तीन बकऱ्या होत्या. अगोदरच लहरी निसर्गाचा फटका त्यात बकऱ्या देखील ठार झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
पाचोरा तालुक्यातील बाळद येथील तितूर नदीवर जवळपास सात कोटी रुपयांचे पुलाचे काम मंजूर करण्यात आले आहे. या पुलाच्या बाजूने मातीचा भराव करण्यात आला होता. दोन दिवसांपासून होणारा सततचा पाऊस तसेच आजूबाजूच्या नाल्याचे पाणी इथे जमा झाल्याने मातीचा हा भराव रविवारी सकाळी वाहून गेला. भराव वाहून गेल्याने लोहटार, नाचणखेडा, गाळण, उपलखेडा, धाप, चुंचाळे, पिंपळगाव, गलवाडे, शिंदाड, धनगरवाडी आणि वडगाव या गावांकडे होणारी रहदारी ठप्प झाली आहे.
धरणगाव तालुक्यातील पाळधी परिसरातील सतत होणाऱ्या पावसामुळे रेल गावात चार घरांचे धाबे कोसळले. त्यात हितेश रवींद्र पाटील व छोटू दिलीप भिल हे दोन गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घर कोसळल्याने दोन बैल व एक गायही ठार झाली आहे. पावसामुळे गिरणा नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.