प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळमार्गे धावणाऱ्या अमरावती, महानगरीसह या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

फेब्रुवारी 16, 2026 11:21 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । मध्य रेल्वेने मुंबई विभागातील वाढती रेल्वे वाहतूक लक्षात घेऊन मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात फेरबदल जाहीर केले. यामध्ये भुसावळमार्गे मुंबई–नागपूर–अमरावती मार्गावर धावणाऱ्या लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही मोठे बदल करण्यात आले असून सुधारित वेळापत्रक १३ एप्रिल आणि १४ एप्रिल पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार आहे.

changetimetrain

नागपूर–मुंबई दुरांतो एक्स्प्रेसच्या वेळेत बदल
मुंबईहून नागपूरकडे धावणारी १२२८९ क्रमांकाची दुरांतो एक्स्प्रेस आता रात्री ०७.५५ ऐवजी ०८.३५ वाजता सुटेल. त्यामुळे कामकाज संपवून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे. परतीच्या प्रवासात १२२९० क्रमांकाची गाडी मुंबईत सकाळी ०८.०५ ऐवजी ०७.५० वाजता म्हणजे लवकर पोहोचेल. सकाळच्या कार्यालयीन वेळेपूर्वीच आगमन होणार असल्याने नियमित प्रवाशांना याचा फायदा होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

अमरावती एक्स्प्रेसच्या वेळेतही बदल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून सुटणारी १२१११ अमरावती एक्स्प्रेस आता ०८.०५ ऐवजी ०८.५० वाजता प्रस्थान करेल. त्यामुळे ठाणे, कल्याण आणि इगतपुरी स्थानकांवरील वेळेत पाच ते १० मिनिटांची सुधारणा करण्यात आली आहे. या गाडीची वेळ बदलल्याने घाट विभागातील सिग्नलिंग आणि क्रॉसिंगची अडचण कमी होईल, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.

महानगरी एक्स्प्रेसचा टर्मिनल बदलला
मुंबई–वाराणसी मार्गावरील २२१७७/२२१७८ क्रमांकाची महानगरी एक्स्प्रेस आता वाराणसीऐवजी बनारस रेल्वे स्थानकावरून सुटून तेथेच समाप्त होईल.२२१७७ मुंबई–बनारस एक्स्प्रेस मुंबईहून पहाटे ००.१५ वाजता प्रस्थान करेल. आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ०३.४५ वाजता पोहोचेल. २२१७८ बनारस-मुंबई एक्स्प्रेस बनारसहून सकाळी ०९.४५ वाजता सुटेल आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४० वाजता पोहोचेल. वाराणसी शहरातील वेगवेगळ्या टर्मिनल्समधील गर्दी कमी करण्यासाठी आणि परिचालन अधिक सुलभ करण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे समजते.

विदर्भ एक्स्प्रेसची वेळही बदलण्यात आली आहे. गोंदिया–नागपूर–सीएसएमटी मार्गावरील ही गाडी सध्या बडनेरा स्थानकावर सकाळी ६.०० वाजता पोहोचते, तर नव्या वेळापत्रकानुसार सकाळी ६.०५ वाजता पोहोचेल.

पुणे–नागपूर गरिब रथ व पुणे–नागपूर एक्स्प्रेसही आता ९.१० ऐवजी सकाळी ९.२० वाजता नागपूर पोहोचतील. या बदलामुळे प्रवाशांना प्रवासाची वेळ थोडी वाढल्याचे जाणवणार आहे, मात्र प्रशासनाच्या म्हणण्यानुसार गाड्यांच्या सुरळीत आणि सुरक्षित संचालनासाठी हा निर्णय आवश्यक ठरला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now