ऐन दिवाळीत राज्यात पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल आज हवामान?
जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑक्टोबर २०२४ । आज (01 नोव्हेंबर 2024) लक्ष्मी पूजनाचा दिवस… एकीकडे जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात थंडीची चाहूल लागत असतानाच पावसाचा इशारा देण्यात आला आहे.भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यातील काही भागावर आज वादळी पावसाचे सावट राहणार आहे.
राज्यातील अनेक भागात पावसाची उघडीप पाहायल्या मिळत असली तरी अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात कमालीची उष्णता वाढली आहे. या भागात कोरडं हवामान राहणार आहे.
ऐन दिवाळीत विजांचा धुमधडाका आणि मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याकडून महाराष्ट्रात कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, धाराशिव आणि बीड जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे. दक्षिण – मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.
रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, नगर व उत्तर सं.नगर, लातूर नांदेड परभणी आणि नाशिक पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा अश्या १२ जिल्ह्यात ढगाळ वातावरणसहित किरकोळ पाऊस तर उर्वरित २४ जिल्ह्यात केवळ स्वच्छ वातावरण जाणवेल.
राज्यात थंडीची चाहूल –
दिवाळीनंतर राज्यात कडाक्याची थंडी पडू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात सध्या पहाटे गारवा जाणवत आहे. राज्यात अनेक शहरातील किमान तापमान २० अंश सेल्सिअसच्याही खाली गेले आहे. अपवादात्मक काही ठिकाणे वगळता राज्यात कमाल तापमानही ३४ अंश सेल्सिअसच्या आत राहण्याची शक्यता आहे. मागील ३ दिवसांपासून नाशिक, अहिल्यानगरसह उत्तर महाराष्ट्रात १८ अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला आहे. सर्वात कमी तापमानाची नोंद महाबळेश्वर येथे नोंदवली गेली.