⁠ 
रविवार, मे 19, 2024

Rain Alert : पुढील ४ दिवस धोक्याचे, खान्देशला यलो तर नाशिकला रेड अलर्ट!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जुलै २०२२ । सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये धो-धो- पाऊस बरसत आहे. जूनमध्ये ओढ दिलेल्या पावसाने जुलैमध्ये पावसाने जोर पकडला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळतेय. दरम्यान, अशातच आता हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ ते १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात जून महिन्यात मान्सूनने अनेक ठिकाणी पाठ फिरवली होती. मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह कोकणात तर पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच आता आता हवामान खात्याकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला असून त्यात कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. येथे १४ ते १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जळगावातील शेतकरी सुखावला :
जळगाव जिल्ह्यात देखील मागील काही दिवसापासून समाधानकारक पाऊस बरसत असलयाने शेतकरी सुखावला आहे. सुरुवातीला मान्सूनने पाठ फिरविल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर चिंतेचे ढग दाटून आले होते. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून जिल्ह्यात पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पेरणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. जिल्हयासाठी पुढील दोन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

संपूर्ण आठवड्याचा वेदर रिपोर्ट :

उत्तर कोकण (North Konkan )- हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १२ ते १५ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे. यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दक्षिण कोकण आणि गोवा (South Konkan & Goa )- दक्षिण कोकण आणि गोव्यातही १२ ते १५ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.

उत्तर मध्य महाराष्ट्र (North Madhya Maharashtra )- उत्तर मध्य महाराष्ट्रातही हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून यामुळे सर्वत्र पाऊस कोसळेल.

दक्षिण मध्य महाराष्ट्र (South Madhya Maharashtra ) – हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्रात १२ ते १५ जुलैपर्यंत तुफान पावसाचा इशारा दिला आहे.

मराठवाडा(Marathwada ) – १२ ते १५ जुलैपर्यंत मराठवाड्यालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र पाऊस होऊन अनेक गावांमध्ये नद्यांना पूर येण्याचा धोका आहे.

पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भ (East Vidarbha – West Vidarbha ) – मुंबई आयमडीकडून पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भात १२ ते १५ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.