जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२४ । राज्यातील विविध भागात पावसाच्या सरी बरसात आहे. तर काही भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी चिंतते आहे. शेतकरी पेरणीसाठी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.दरम्यान, आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यातील काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट तर काही भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या दोन जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर मुंबईसह ठाण्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रात देखील आज जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बुधवारी रात्री जळगाव जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. तर काही भागात अद्यापही पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. सध्या जिल्ह्यातील ज्या भागात चांगला पाऊस झाला तेथे पेरणीला वेग आला आहे. जळगावात सध्या ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळत असून आज दुपारनंतर पावसाची शक्यता आहे.