जळगाव लाईव्ह न्यूज । २६ सप्टेंबर २०२२ । राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मुंबईसह परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे.मात्र अजून २ दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे. कारण 26 ते 28 ऑक्टोबर राज्यातील काही जिल्ह्यात पाऊस होईल असा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
कोकणात आणि विदर्भात हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यात देखील काही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 26 सप्टेंबरला नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातुर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर 27 सप्टेंबर रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद आणि लातुरात मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 28 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, जालना, बीड आणि लातुरात विजांच्या गडगडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात देकील 27 आणि 28 सप्टेंबर रोजी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. तर 8 ऑक्टोबरला मुंबईतून मान्सून निरोप घेणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. राज्यात जून महिन्यात पावसानं उघडीप दिली होती. मात्र, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं राज्यात धुमाकूळ घातला होता. तसेच सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला देखील राज्यात चांगल्या पावसानं हजेरी लावली होती.