पावसाची उघडीप संपणार? राज्यातील या जिल्ह्यात पावसाचा अंदाज, जळगावात काय स्थिती?

सप्टेंबर 1, 2026 11:36 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावसह संपूर्ण राज्यात गेल्या काही दिवसांपासून मॉन्सून पावसाने विश्रांती घेतली असून, पावसात मोठी तूट पाहायला मिळत आहे. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात मात्र सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या तुरळक सरी पाहायला मिळत आहे.

rain 1

‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या चार जिल्ह्यांमध्ये आज काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळू शकतात. मराठवाड्यातील इतर भाग आणि मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका आणि ढगाळ हवामानाचा खेळ सुरू राहून अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या काही भागात पावसाने उघडीप दिली असली, तरी घाटमाथ्यावर हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील असा अंदाज आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि उत्तर-मध्य महाराष्ट्र ते गुजरात दरम्यान तयार झालेल्या नवीन हवामान प्रणालीमुळे राज्यात ठिकठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे पुढील काही दिवसांत राज्यात पुन्हा पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, आज दिवसभर राज्यात ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यात मागच्या अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके धोक्यात आली असून, बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. ऑगस्ट कोरडा गेल्याने आता सप्टेंबर महिन्यात पाऊस कसा बरसणार, याकडे शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांचे डोळे लागले आहेत.

दरम्यान, आज मंगळवारी जळगाव शहरासह परिसरात सकाळपासून पावसाची अधूनमधून रिपरिप पाहायला मिळत आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, सध्या होत असलेला हलका पाऊस शेतीसाठी कितपत उपयुक्त ठरेल, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. सप्टेंबर महिन्यात तरी पावसाची भरपाई होणार का? याबाबत शेतकरी आणि सर्वसामान्यांमध्ये उत्सुकता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार सध्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता कमी असून आगामी दिवसांत पावसाची स्थिती कशी राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now