जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२१ । राज्यातील विविध भागात पावसाचा जोर अद्यापही कायम आहे. जळगाव जिल्ह्यात काल रविवारी दिवसभर रिमझिम पावसाने हजेरी लावली. तर आज सोमवारी जळगाव जिल्हा पुन्हा येलो झोनमध्ये आला असून शहरासह जिल्ह्यात पुढील काही दिवस दमदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं पुढील पाच दिवसात कोणत्याही जिल्ह्याला रेड अॅलर्ट दिलेला नाही.
प्रादेशिक हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं राज्यात काल रविवारी नंदुरबार, नाशिक, जळगाव, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे काल रविवारी जळगाव जिल्ह्यात दिवसभरा मध्यम पावसाने हजेरी लावली. भारताच्या वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज जळगाव जिल्हा पिवळ्या झोनमध्ये आहे.
राज्यातील पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अदाज जारी करताना हवामान विभागानं पुढील पाच दिवसात मुंबईला कोणताही अॅलर्ट दिलेला नाही. मुंबईसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.
28 जुलैनंतर पाऊस पुन्हा सक्रिय
हवामान खात्याच्या माहितीनुसार, 28 तारखेनंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय होईल. कारण 28 जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा हा कर्नाटककडे सरकला आहे. त्यामुळे राज्यातील पावसाचा जोर तुर्तास ओसरेल.मात्र ठाणे ,रायगड, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग , धुळे, नंदूरबार, नाशिक या जिल्ह्यांसाठी हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये अजूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.