जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२४ । राज्यात गेल्या काही दिवसापासून गायब झालेला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्यातील विविध भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, आजपासून पुढील ५ दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जाहीर करण्यात आला आहे.
यंदा महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वी दाखल होऊनही त्यानंतर पावसाला अनुकूल वातावरण नसल्याने पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पेरणी थांबवली आहे. शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत असून अशातच आज शनिवारपासून पुढील ५ दिवस राज्यात जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे.
राज्यात कुठे कुठे कोसळणार पाऊस?
मुंबईसोबतच आज पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यांतील काही ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी बरसतील.
नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुबार आणि जळगाव जिल्ह्यातही आजपासून जोरदार पावसाला सुरुवात होईल. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ५ दिवस राज्यात पावसाची अशीच स्थिती राहिल, असं भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे.