जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२४ । मागील काही दिवसापासून राज्यातील काही ठिकाणी ऐन हिवाळ्यात पावसाच्या सरी कोसळत आहे. अवकाळीमुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून पावसाचं संकट कधी दूर होणार, याची वाट बळीराजा पाहत आहे. अशातच हवामान खात्याने अवकाळीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट
पुढील 24 तासांत राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच कोकणातही हलक्या पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून नाशिक, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर, पुणे, सातारा, जालना जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावारण पाहायला मिळणार आहे.
आज मंगळवारी उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास पावसाचा यलो अलर्ट दिला आहे; तर बुधवारी धुळे, जळगाव, नाशिक, नगर जिल्ह्यास पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
गुरुवारपासून थंडी वाढणार
दरम्यान, राज्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढणार आहे. 11 जानेवारीपासून हे ढगाळ वातावरण निवळेल आणि थंडी पुन्हा परतण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. मात्र महाराष्ट्रात ढगाळ हवामानामुळे किमान व कमाल तापमान सरासरी इतकेच हाेते.