जळगाव लाईव्ह न्यूज । १४ नोव्हेंबर २०२४ । राज्यात पुन्हा एकदा विचित्र हवामान स्थिती निर्माण झालीये. सर्वत्र थंडीचा जोर वाढत असतानाच राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढत तापमान तब्बल 11 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. तर कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यांवर आज अवकाळी पावसाचे सावट कायम आहे.
भारतीय हवामान विभागकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर तमिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनापट्ट्यालगतचे कमी दाबाचे क्षेत्र निवळले आहे. तर अरबी समुद्राच्या केरळ किनापट्ट्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. या भागातील वातावरणातील या बदलाचा परिणाम महाराष्ट्रावर होत असून परिणामी उत्तर महाराष्ट्रातील तापमान घसरले आहे. तर दुसरीकडे आज पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापुर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
यंदा परतीचा पाऊस लांबल्याने थंडीची चाहूल देखील उशीराने लागली. अशात राज्यातील काही भागात थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर महाराष्ट्रासह इतर भागात थंडीची लाट असली तरी कोकणासह दक्षिण महाराष्ट्रात आज काही ठिकाणी अवकाळी पावसाचे सावट आहे. यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर रायगड, पुणे, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाची ही शक्यता लक्षात घेता या भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.