शेतकऱ्यांनो काळजी घ्या.. जळगाव जिल्ह्यात गडगडाटासह पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२२ । मागील काही दिवसापासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात थंडी कमी झाली आहे. जळगावात गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. ऐन थंडीच्या मोसमात जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

मेंडोस चक्रीवादळामुळे राज्यात ऐन थंडीत पाऊस कोसळतोय. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालन्यात आज, उद्या गडगडाटासह हलका/मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे

दाक्षिण-पूर्व अरबी समुद्र, केरळ, कर्नाटक, किनारपट्टी जवळ आज सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे याचा परिणाम राज्यावर देखील झाला आहे. राज्यात येत्या 24 तासात काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका-मध्यम पाउस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने माहिती दिली आहे. मेघगर्जनेसह जोरदार वारे ही वाहण्याची शक्यता आहे. अन्य ठिकाणी दर्शविल्या प्रमाणे आज, उद्या गडगडाटासह हलका/मध्यम पावसाची शक्यता आहे. पावसाळी वातावरण निवळताच उद्यापासून दि. 15 रोजी किमान तापमानात 3 ते 5 अंशांची घट होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मागील काही दिवसापूर्वी जिल्ह्यात थंडीचा काडका काहीसा वाढला होता. मात्र सध्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.