जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जुलै २०२४ । राज्यात मान्सून पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून अनेक ठिकाणी पाऊस सुरु आहे. राज्यात आज म्हणजेच रविवारी पावसाचा जोर आणखीच वाढणार, अशा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसाच्या विश्रांती पुन्हा पावसाने हजेरी लावली. आज जळगावसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी (१४ जुलै) अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे.तर मुंबई, पुण्यासह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे.या जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम घाटाच्या परिसरातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदूरबार वगळून सर्व जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील ४ दिवस राज्यात पावसाची अशीच परिस्थिती राहणार, असंही सांगण्यात आलं आहे.
आज जळगावला येलो अलर्ट
जळगाव जिल्ह्यात जुलै महिना निम्मे संपला तरी अद्याप जोरदार पाऊस झालेला नाही. दरम्यान, शनिवारी जळगाव शहरात ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान आज जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून पहाटे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. १५ व १७ जुलै या दोन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.