लहान मुलांबाबत रेल्वेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय! प्रवासाआधी वाचा ही बातमी..
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२३ । भारतातील बहुतांश लोक हे रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. यासाठी प्रवाशांचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित व्हावा, यासाठी रेल्वे वेळोवेळी अनेक बदल करत असते. लहान मुलांबाबत रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे. तुम्हीही तुमच्या मुलासोबत प्रवास करणार असाल तर तुम्हाला हे नियम माहित असले पाहिजेत.
नेमका काय निर्णय घेतला?
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी स्वतंत्र बेबी बर्थ बनवण्याचा विचार विभाग करत आहे, जेणेकरून मुलांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना त्यांची जागा मिळू शकेल. याबाबत रेल्वेने दुसऱ्या फेरीची चाचणी सुरू केली आहे. लहान मुलांच्या बर्थच्या भाड्याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. भाडे रेल्वे बोर्ड ठरवेल.
लांबच्या प्रवासात मुलांना त्रास व्हायचा
लांबच्या प्रवासात मुलांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे अनेकदा दिसून येते. त्यादृष्टीने विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्याची चाचणी मे 2022 मध्ये लखनऊ मेलवरून सुरू झाली. चाचणीच्या सुरुवातीला त्यात काही उणिवा दिसल्या. यासोबतच त्याचे खूप कौतुकही झाले आहे. सध्या विभागाकडून त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे.
चाइल्ड सीटसाठी एक नवीन डिझाईन बनवण्यात आले आहे, जे पूर्वीपेक्षा जास्त आरामदायी आणि सुरक्षित आहे. प्रत्येक कोचमध्ये प्रत्येक सीटसह हा नवीन बेबी-बर्थ बसवण्याची गरज नाही. जो प्रवासी तिकीट बुक करताना हा बेबी-बर्थ बुक करेल, त्याला रेल्वे त्याचे वाटप करेल. सीटवर बेबी बर्थ बसवण्यासाठी प्रवासी TTE किंवा रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधू शकतील. बेबी बर्थ हुकच्या मदतीने सामान्य बर्थला जोडता येते.