⁠ 
रविवार, मे 5, 2024

भुसावळ विभागातील ‘या’ रेल्वे स्थानकांचे होणार नूतनीकरण; पंतप्रधानांच्या हस्ते होणार भूमिपूजन

जळगाव लाईव्ह न्यूज| ५ ऑगस्ट २०२३। अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील विविध रेल्वेस्थानकांचे नूतनीकरण होणार असून, त्यात पहिल्या टप्प्यात भुसावळ विभागातील सहा रेल्वेस्थानकांच्या विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (ता. ६) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करणार आहेत. यासाठी सुमारे १८० कोटी रुपये खर्च येणार असून, यात लँडस्केपसह प्रवाशांना विविध सुविधा देऊन स्थानकाचा संपूर्ण लुक बदलविला जाईल, अशी माहिती रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इती पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्रीमती पांडे म्हणाल्या, की पंतप्रधान मोदी यांचे भविष्यातील भारतीय रेल्वेसंदर्भात एक व्हिजन आहे. त्याचाच एक भाग म्हणून अमृत भारत स्टेशन योजनेसाठी देशातील एक हजार ३०९ स्थानकांची निवड करण्यात आली. यात मध्य रेल्वेच्या ७६ स्थानकांचा समावेश आहे; तर भुसावळ रेल्वे विभागाच्या १५ स्थानकांचा समावेश आहे.

मात्र, पहिल्या टप्प्यात मनमाड, बडनेरा, शेगाव, मलकापूर, नेपानगर, चाळीसगाव या सहा स्थानकांचा समावेश आहे. विकासकामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाइन केले जाईल. या संदर्भात मनमाड रेल्वेस्थानकावर विभागाचा मुख्य कार्यक्रम होणार असून, त्यासाठी मंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांची प्रमुख उपस्थिती असेल.

रविवारी सकाळी अकराला होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त मनमाड रेल्वेस्थानकावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पांडे म्हणाल्या, की रेल्वेच्या आधुनिकीकरणात आपला सांस्कृतिक वारसा जपून सुशोभीकरण होईल. त्यात प्रवासी सुविधेला प्रथम प्राधान्य असणार आहे.

भुसावळ विभागातील सर्व विभाग मिळून ‘गतीशक्ती युनिट’च्या माध्यमातून हा भव्य प्रकल्पही साकारला जात आहे. याशिवाय, अनेक सुविधा असून, या संदर्भात प्रवाशांच्या आणखी काही सूचना असतील तर BHUSAWALDRM@Gmail.com व ट्विटरवर सूचना कराव्यात, जेणे करून अधिक चांगले काय करता येईल, असे आवाहन इति पांडे यांनी केले.