रब्बी हंगाम : पिकांसाठी कालव्यातून आवर्तन, ३१ डिसेंबरपर्यंत करा अर्ज
जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२१ । गिरणेसह विविध कालव्यांमधून मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा रब्बी हंगामातील पिकांसाठी फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना ३१ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करावे लागणार आहे. त्यानंतर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना आवर्तन मिळण्यासाठी अडचणी येतील.
कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग यांचे अधिपत्याखालील जिल्हा लाभक्षेत्रातील, गिरणा मोठा प्रकल्प, पांझरा डावा कालवा, जामदा डावा आणि उजवा कालवा, निम्म गिरणा कालवा, जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघू प्रकल्प व वळण बंधाऱ्यावरील अधिसूचित नदी, नाले तसेच गिरणा नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या रब्बी हंगामासाठी दिला जाणार आहे. यासाठी सर्व बागायतदारांनी आपले नमुना नंबर ७ अ, ब चे पाणी अर्ज संबंधित शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावे. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजुरी देण्यात येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. मंजुरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेता येणार नसल्याचे सूचित करण्यात आले.
जिल्ह्यात लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून ३५ मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना ७ (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्जी क्षेत्र भिजवण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पध्दतीने पाणी देण्यात येईल, असेही कळवण्यात आले आहे.