जगण्याच्या वारीत मिळेना वाट
साचले मोहाचे धुके घनदाट
आपली माणसं आपलीच माती
तरी कळपाची मेंढरास भीती
विठ्ठला …कोणता झेंडा घेऊ हाती ?
आजवर ज्यांची वाहिली पालखी
भलताच त्यांचा देव होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी
दगडात माझा जीव होता
उजळावा दिवा म्हणुनीया किती
मुक्या बिचार्या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोई साथी
विठ्ठला …कोणता झेंडा घेऊ हाती ?
बुजगावण्यागत व्यर्थ हे जगणं
उभ्या उभ्या संपून जाई
खळं रितं रितं माझं बघुनी उमगलं
कुंपण इथं शेत खाई
भक्ताच्या कपाळी अन् सारखीच माती
तरी झेंडे येगळे.. येगळ्या जाती
विठ्ठला …कोणता झेंडा घेऊ हाती ?
जळगाव लाईव्ह न्यूज । विशेष । झेंडा चित्रपटातील हे गाणं सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीत शिवसेनेला तंतोतंत लागू होत आहे. जळगाव जिल्ह्यातही फारशी वेगळी परिस्थिती नाही. शिवसेनेचे हेवीवेट नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेच्या ५५ पैकी ४० पेक्षा अधिक आमदार त्यांच्या सोबतआहेत. यात जळगाव जिल्ह्यातील खान्देशची मुलूखमैदान तोफ अशी ओळख असलेले विद्यमान मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोरआप्पा पाटील व आमदार लताताई सोनवणे यांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील शिवसेनेचे चारही आमदार शिंदें यांच्या सोबत गेल्याने आपण नेत्यांच्या बाजूने उभे रहावे का पक्षनिष्ठा दाखवावी? असा प्रश्न जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पडला आहे.
जळगाव जिल्हा परिषदेत शिवसेनेचे १५ सदस्य आहेत. महापालिकेत धणुष्यबाण या चिन्हावर १५ नगरसेवक निवडून आले. यासह नगर पालिका, पंचायत समित्या, ग्रामपंचायतींसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थावर शिवसेनेची सत्ता आहे. असे असले तरी त्यावर नियंत्रण जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांचेच आहे. यामुळे जर चारही आमदार शिंदे गटासोबत जात असल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. जोपर्यंत राज्यातील सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होत नाही तो पर्यंत कोणता झेंडा घेवू हाती? हा प्रश्न सर्वांना सतावतच राहिल!
जळगावात १९६८ मध्ये शिवसेनेची पहिली शाखा
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सन १९६६ मध्ये मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेची मुहुर्तमेढ रोवल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच बाळासाहेबांच्या विचारांचे वादळ जळगाव जिल्ह्यात पोहचून सन १९६८ मध्ये शिवसेनेची पहिली शाखा उघडण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील ढाण्यावाघ म्हणून ओळखले जाणारे श्री.नेहेते यांच्याकडे जिल्हाप्रमुख पदाची सुत्रे सोपविण्यात आली. त्यांनी तत्कालीन शिवसैनिकांना सोबत घेवून घराघरात बाळासाहेबांचा विचार पोहचविला. यानंतर राणाजींकडे जिल्हाप्रमुख पद सोपविण्यात आले. हे राणाजी म्हणजे माजी जिल्हाप्रमुख गणेश राणा यांचे वडिल! राणाजी यांच्यानंतर सदाशिव ढेकळे, अॅड. जगदिश कापडे, राजेंद्र दायमा, गणेश राणा, गुलाबराव वाघ, आमदार गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत पाटील यांनी टप्प्याने जबाबदारी पेलली. यामध्ये राजेंद्र दायमा यांनी सर्वाधिक १६ वर्ष म्हणजे १९९४ ते २००९ दरम्यान हे शिवधनुष्य पेलले. याच काळात सेनेने सत्तेची फळे चाखली.
हेही वाचा : मोठी बातमी : काल मुख्यमंत्र्यांसोबत असलेले जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आज नॉट रिचेबल
हरिभाऊ महाजन शिवसेनेचे पहिले आमदार
सन १९९० जिल्ह्यातून पहिले आमदार म्हणून हरिभाऊ महाजन यांनी विधानसभेत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून एन्ट्री केली. त्यानंतर १९९५ मध्ये दिलीप भोळे हे देखील विधानसभेवर निवडून गेले. १९९९ ची विधानसभा निवडणूकीने जिल्ह्यातील शिवसैनिकांना शक्तीवर्धक डोस दिला! यावर्षी गुलाबराव पाटील, आर.ओ.पाटील, दिलीप भोळे, कैलास पाटील व चिमणराव पाटील असे पाच आमदार निवडून आले. सहा पैकी पाच उमेदवार निवडून आल्याने हा जिल्हा शिवसेनाचा बालेकिल्ला म्हणून नावारूपाला आला. सन २००४ मध्ये चिमणराव पाटील, गुलाबराव पाटील, आर.ओ.पाटील व कैलास पाटील असे चार उमेदवार निवडून आले. यावेळी एक आमदार कमी झाले असले तरी सेनेची ताकद वाढली होती, हे सत्य कोणीही नाकारू शकणार नाही. यानंतर झालेल्या २००९ च्या निवडणूक मात्र केवळ दोन आमदार निवडून आले. खान्देशची मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांच्यासह अन्य दिग्गज पराभूत झाले. यावर्षी चिमणराव पाटील व पुन्हा स्वगृही परतलेले सुरेशदादा जैन हे निवडून आले. यानंतर २०१४ मध्ये गुलाबराव पाटील यांनी पुन्हा दमदार पुनरागमन करत विद्यमान जिल्हाप्रमुख किशोर पाटील व प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनाही निवडून आणले. मात्र या निवडणूकीत सुरेशदादा जैन व चिमणराव पाटील यासारख्या दिग्गज नेत्यांसह दुसरे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील थोड्या मतांनी पराभूत झाले. त्यांनतर २०१९ मध्ये गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील, किशोर आप्पा पाटील, लताताई सोनवणे हे निवडून आले आहेत.
…तर जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच उरेल
एकंदरीच जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेची घोडदौड ही स्थानिक नेत्यांच्या चेहर्यावर राहिली आहे. पक्षापेक्षा नेत्याला मानणार्या कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे, हे नाकारुन चालणार नाही. राहिला विषय पक्ष संघटनेचा तर संघटनेत अशीच चेहरे जास्त आहेत ज्यांच्यामागे फारसे कार्यकर्ते नाहीत. यामुळे पक्ष संघटनेतही स्थानिक वजनदार नेत्यांचाच शब्द अंतिम मानला जातो. जळगाव जिल्ह्यात गुलाबराव पाटील, चिमणराव पाटील व किशोर पाटील हे मासबेस नेते आहेत. ते जर एकनाथ शिंदे यांच्या सोबत जात असतील तर संघटनेत निर्माण झालेल्या पोकळीत आपल्याला काही संधी मिळेल, या आशेने काही जण किमान दिखाव्यासाठी तरी पक्षनिष्ठा दाखवतील, असा जाणकारांचा अंदाज आहे. शिवाय जे नगरसेवक म्हणून देखील निवडून येवू शकत नाहीत ते कथित नेते शिंदेंसोबत गेलेल्या मासबेस नेत्यांना आव्हान देण्याची भाषा करत असल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्र टिव्हीवर पाहत आहेत. यामुळे जिल्ह्यातील चारही मासबेस आमदार वेगळी चूल मांडत असतील तर जिल्ह्यात शिवसेनेचे अस्तित्व केवळ कागदोपत्रीच उरेल, हे नाकारता येणार नाही.