जळगाव जिल्हा

नवरात्रोत्सवाची लगबग! देवीच्या मूर्तींवर अखेरचा हात; यंदा किमतीत २०% पर्यंत वाढ

जळगाव लाईव्ह न्यूज । नवरात्रोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शहरासह परिसरात उत्सवाची तयारी वेगाने सुरू झाली आहे. देवीच्या विविध रूपांतील आकर्षक मूर्ती साकारण्याचे काम मूर्तिकारांकडून अंतिम टप्प्यात आले असून, अष्टभुजा माता, सप्तशृंगी माता, तुळजाभवानी, कालिंका माता, सरस्वती, महालक्ष्मी आणि नवदुर्गेच्या मूर्तींवर सध्या अखेरचा हात फिरवला जात आहे.

मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सकाळपासून रात्रीपर्यंत लगबग सुरू असून, देवीच्या मूर्तींना आकर्षक रंगरंगोटी आणि सजावट करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भक्तांच्या मागणीनुसार विविध आकार आणि रूपांमध्ये देवीच्या मूर्ती तयार करण्यात येत आहेत.

मूर्तींच्या किमतीत १० ते २० टक्के वाढ

यंदा मात्र देवीच्या मूर्ती खरेदी करणाऱ्या भक्तांच्या खिशावर काहीसा अतिरिक्त भार पडणार आहे. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम कच्च्या मालाच्या किमतीवर झाल्याने मूर्तींच्या दरात सुमारे १० ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे मूर्तिकारांकडून सांगण्यात येत आहे.

नवरात्रोत्सवासाठी मंडळांकडून तसेच घरगुती स्थापनेसाठी देवीच्या मूर्तींची मागणी वाढत असून, आगामी काही दिवसांत मूर्तींची विक्री आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मूर्तिकारही वेळेत ऑर्डर पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतही उत्साहाचे वातावरण असून, देवीच्या मूर्तींसोबतच सजावटीचे साहित्य, पूजेचे साहित्य आणि इतर वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button