जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मे २०२२ । देशात सध्या ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा जोरात असताना महाराष्ट्रात देखील एक विषय समोर येत आहे. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुण्यात ‘पुण्येश्वर मुक्ती’ अभियान हाती घेण्याचे जाहीर केले आहे. खिलजी घराण्याचा सेनापती अलाउद्दीन खिलजी याने पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरे पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच मंदिरे पाडल्यानंतर त्यावर दर्गा बांधण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसापासून हिंदुत्वाची भूमिका घेतली असून भोंगे, हनुमान चालीसा अशा विषयांना त्यांनी हात घातला आहे. मनसे सरचिटणीसकडून पुण्येश्वर मुक्ती अभियानाच्या निमित्ताने नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून महाराष्ट्रात नवा वाद सुरू होताना दिसत आहे. ज्ञानवापीवरून वाराणसीच्या न्यायालयात सुनावणी सुरु असून त्याकडे सर्व भारतीयांचे लक्ष लागून आहे. हिंदुत्वाचा मुद्दा घेत पुढे येत असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मनसेने पुणे शहरातील दोन दर्गे मंदिराच्या जमिनीवर बांधल्याचा दावा केला आहे. ज्ञानवापी, कुतुबमिनार, मथुरा नंतर नुकतेच मुंबईतील औरंगजेबाच्या कबरीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यानंतर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने हे स्मारक ५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
रविवारी, मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले की त्यांनी ‘पुण्येश्वर मुक्ती’ मोहीम सुरू केली आहे. जनतेने राज ठाकरेंच्या पक्षाला पाठिंबा देण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील ज्ञानवापी मशीद सर्वेक्षणाचा संदर्भ देत शिंदे म्हणाले की, राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर सरकारची झोप उडू लागली आहे. ज्ञानवापीप्रमाणेच पुण्यातील पुण्येश्वर मंदिरासाठीही आम्ही लढत आहोत, असे ते म्हणाले. खिलजी घराण्याचा सेनापती अलाउद्दीन खिलजी याने पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरे पाडल्याचा दावा त्यांनी केला आहे. मंदिरे पाडल्यानंतर त्यावर दर्गा बांधण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.