जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२५ । जळगावमार्गे धावणाऱ्या पुणे-नागपूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांना ५ सप्टेंबरपासून चार अतिरिक्त जनरल डबे जोडले जाणार आहेत. यामुळे प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. तसेच चारशे प्रवासी वाढणार आहेत.

जळगावसह खानदेशातून पुण्यात येणाऱ्या दैनंदिन प्रवाशांची संख्या जास्त आहे. जळगाव स्थानकांवरून पुण्यासाठी मोजक्याच गाड्या धावतात. त्यातही अनेक वेळा प्रवाशांना रेल्वेची कन्फॉर्म तिकीट मिळत नाही. नाइलाजाने त्यांना खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करण्याची वेळ येते. खासगी ट्रॅव्हल्सने पुण्यासाठी प्रवास केला तर सुमारे ७०० ते १००० रुपये मोजण्याची वेळ प्रवाशांवर येते.

आता रेल्वेनं पुणे-नागपूर-पुणे दरम्यान धावणाऱ्या एक्स्प्रेसला चार अतिरिक्त जनरल डब्बे जोडण्याचा निर्णय घेतल्याने स्वस्तात प्रवास करणे प्रवाशांना शक्य होणार आहे.







