डॉ.के.के.भोळे यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहराच्या अध्यात्मिक व साहित्य क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ.के.के. भोळे यांनी लिहिलेल्या पसायदान – एक चिंतन आणि कलियुगातील नामाचा महिमा या दोन पुस्तकांचा प्रकाशन समारंभ संकट मोचन हनुमान मंदिराच्या सभागृहात रविवारी (दि.५) रोजी संपन्न झाला.
प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ॲड. प्रवीणचंद्र जंगले हे होते तर प्रमुख उपस्थिती ह.भ.प. दिनकर महाराज, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष डी.टी. चौधरी, मध्य रेल्वेतील सेवानिवृत्त अभियंता हेमंत खडके, प्रभात चौधरी, बाळासाहेब यावलकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत भोळे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. तसेच याप्रसंगी मुद्रक मनिष जाधव, पुस्तकाची अक्षरजुळणी व मुखपृष्ठ करणाऱ्या ज्योती लोखंडे यांचाही सन्मान करण्यात आला. पुस्तक प्रकाशनानंतर आनंदाश्रम सेवा संस्थेचे अध्यक्ष सत्यनारायण खटोड, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष डी.टी.चौधरी, आर.सी.पाटील, इ.डी.चौधरी, बहिणाई ज्येष्ठ नागरिक महिला संघाच्या अध्यक्षा आशाताई तळेले, ह.भ.प.दिनकर महाराज, प्रभात चौधरी आदींनी आपले मनोगत व के.के.भोळे यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
पुस्तक लिहिण्यामागची भूमिका आपल्या जीवनातील अनुभवकथनातून डॉ. के.के.भोळे यांनी व्यक्त केली तर ॲड.प्रविणचंद्र जंगले यांनी अध्यक्षीय भाषणात, आजच्या काळात अध्यात्माचे महत्व व नामजपाचा महिमा या विषयी वयाच्या ८३ व्या वर्षी लेखन करुन पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल डॉ.भोळे यांचे आभार मानले. तसेच आजच्या आधुनिक काळातील पिढीला पसायदान व नामजपाचा महिमा या माध्यमातून निश्चितच कळेल असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश शुक्ल यांनी मानले.