जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । श्री क्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे आदिशक्ती मुक्ताईचे अंतर्धान स्थळ असुन वारकरी संप्रदायात आदिशक्ती मुक्ताईला मानाचे स्थान आहे.श्री क्षेत्र कोथळी येथे वर्षभर भाविक भक्तांचा राबता असतो. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने सदर तीर्थ स्थळाला “ब” दर्जा मिळाला असून एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नाने मुक्ताई अंतर्धान स्थळी असलेल्या मुक्ताई मंदिर जिर्णोद्धाराचे काम शासनाच्या ग्रामविकास विभाग कडुन तिर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत सुरू आहे. यात मुक्ताई मंदिराला प्राचीन हेमाडपंथी लुक देण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी मिळाली असुन आतापर्यंत ९ कोटी ९७ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.
मिळालेल्या निधीतून आतापर्यंत मंदिरातील गाभारा, सभामंडप, दुमजली दर्शनबारी, पहिला मजला मंदिराचे दर्शनी घुमट, मंदिराचा कळस हे काम जवळपास पुर्ण झालेले आहे परंतु रंगरंगोटी, विद्युतीकरण, संगणकीकरण, हिरवळ व इतर बांधकाम पुर्णत्वास जाण्यासाठी निधीची कमतरता भासत असल्या कारणाने मंदिराचे जीर्णोद्धाराचे बांधकाम थांबले आहे. तसेच जुन्या निधीत जि एस टिचा समावेश नव्हता म्हणून एकनाथराव खडसे यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ११ कोटी रुपये खर्चाचा सुधारित प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष तथा मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र भैय्या साहेब पाटील आणि जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन या सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात यावी व कोथळी येथील हे काम पुर्णत्वास जाण्यासाठी वाढीव निधी मिळावा अशी विनंती केली. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लवकरच मुक्ताई मंदिराच्या सुधारित प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असे आश्वासन दिले.
जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांनी मुक्ताईनगर येथील बोदवड रोडवर असलेल्या नविन मुक्ताई मंदिर परिसरात वर्षभर विशिष्ट धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी व आदिशक्ती मुक्ताईच्या दर्शनासाठी वर्षभर मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ असते. तरी भाविकांच्या निवासांची व्यवस्था होण्यासाठी नविन मुक्ताई मंदिर परिसरात भक्त निवासाची निर्मिती करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचेकडे मागणी केली.
यावेळी त्यांच्यासोबत पारनेरचे आमदार कोरोना योद्धा निलेश लंके, बोदवड राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा चिटणीस विजय चौधरी, सम्राट पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे बोदवड तालुका अध्यक्ष हर्ष कोटेचा, मनोज पाटील, पांडुरंग नाफडे उपस्थित होते.