शासकीय कंत्राटदार एकवटले, जळगाव जिल्ह्यात PWD विभाग निधीसाठी पालकमंत्र्यांना साकडे

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । जिल्हयात PWD विभागासाठी निधी उपलब्ध करुन देण्याबाबत आज शासकीय कंत्राटदार संघटनेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत निवेदन दिले. याबाबत योग्य तो पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन ना.पाटील यांनी दिले.

शासकीय कंत्राटदार संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात सा.बां. विभाग अंतर्गत रस्ते मजबुतीकरण व दुरुस्ती करणे, पुल क्रार्कीट रस्ते, शासकीय इमारती बांधकाम व इतर कामे केली जातात. सा.बां. विभागामध्ये वरील नमुद कामांचे शासकीय कंत्राटदारांना मार्फत केलेल्या कामांचे देयके मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत. शासनाकडुन पुरेसा निधी न मिळाल्यामुळे, कंत्राटदारांचे शेकडो कोटी रुपयाचे देयके थकीत आहे. दिवाळी २०२२ पुर्वी प्रलंबीत देयके अदा करण्यासाठी पुरेसा निधी मिळेल अशी अपेक्षा होती.पंरतु प्रलबित देयकांच्या तुलनेत तुटपुंज्या तरतुदीनुसार अत्यल्प निधी प्राप्त झाला.

ऐन दिवाळीत कंत्राटदारांची चेष्टा शासनाने केली. देयके अदा करण्याकामी पुरेसा निधी नसल्याकारणाने कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहे. बँक बाजारपेठ-पुरवठादार इंधन कर्मचारी पगार टॅक्स साठी लाखो रुपये थकल्याने समाजात शर्मेने मान खाली घालण्याची वेळ आली आहे. कार्यस्थळासंबधीत ग्रामस्त मंडळी, स्थानिक पातळीवरील राजकीय पदाधिकारी तसेच तालुक्याचे लोकप्रतिनिधींचा काम पुर्ण करण्याबाबतचा तगादा सुरुच असतो. यामुळे सर्व कंत्राटदारांवर मोठे दडपण येणे सहाजीक आहे. निधी अभावी देयके प्रलंबित राहील्याने एकीकडे काम पुर्ण करण्यासाठी दडपण व दुसरीकडे आर्थिक कुचंबणा कंत्राटदार यामुळे संभ्रम अवस्थेत आहेत.

सप्टेंबर २०२२ अखेरपर्यत प्रलंबित देयकांची अंदाजीत रक्कम खालील प्रमाणे आहे. सार्वजनिक बांधकाम मंडळ अतर्गत चारही विभाग रु.३०० कोटी (सर्व लेखाशिर्ष) ऑक्टोबर २०२२ मध्ये शासनाने वितरीत केलेला निधी- रु.२९ कोटी. राज्यभरातील इतर जिल्हयामध्ये वितरीत निधी जास्त आहे. या सर्व कारणांमुळे कंत्राटदार पुढील कामे सुरु ठेवण्यास इच्छुक नाहीत. रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत.

कृपया आपण शासन स्तरावर आमची निधी मागणी करावी व जिल्ह्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन घ्यावा जेणेकरुन २०२२-२३ मध्ये कामे सत्वर पुर्ण करता येतील. निधी न मिळाल्यास नाईलाजाने संपुर्ण जिल्ह्यात काम बंद आंदोलन पुकारण्याशिवाय पर्याय शिल्लक राहणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी अभिषेक कौल, राहुल सोनवणे, भुषण पाटील, राहुल तिवारी, सुनील पाटील, सुधाकर कोळी, अनिल सोनवणे, नाना सोनवणे, संदीप भोरटक्के, राजेंद्र चौधरी, मिलिंद अग्रवाल, शितल सोमवंशी, स्वप्नेश बाहेती, मनीष पाटील, प्रशांत महाजन, नितीन गोसावी, विनय बढ़े, प्रमोद नेमाडे, कैलास भोळे आदि उपस्थित होते.