जळगाव लाईव्ह न्यूज । २एप्रिल । २०२२। भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी महाविद्यालयांकडून १२ एप्रिल पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहे.
कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी विविध समित्या गठीत केल्या आहेत. या वर्षभरात विविध कार्यक्रम, स्पर्धा, उपक्रम आयोजित केले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून महाविद्यालयांना अनुदान दिले जाणार आहे. यामध्ये देशभक्ती गीत गायन, युवा संसद, काव्यवाचन, पोवाडा गायन, पोस्टर सादरीकरण, निबंध, कथा-कथन, चित्रकला, तिरंगा यात्रा, शहीद स्मारक सायकल यात्रा, लघुपट, पुस्तक प्रकाशन, व्याख्यान, नाट्यप्रयोग, मॅरेथॉन आदी कार्यक्रम महाविद्यालये, परिसंस्था आणि प्रशाळांमध्ये घेण्यासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने प्रस्ताव मागविले आहे. १२ एप्रिल पर्यंत प्रस्ताव पाठवावेत असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक डॉ.सुनील कुलकर्णी यांनी केले आहे.