४८ तासात तब्बल ७ प्रसूत्या;आरोग्य कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता
Dhanora News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन रुग्ण तपासणीच्या प्रमाणात वाढ झालेली असून जवळपास ऑगस्ट ते आजपर्यंत तीन हजारावर रुग्णांची दैनंदिन तपासणी झाली आहे. तसेच या महिन्यात ४८ तासात तब्बल ७ महिलांची प्रसूती झाली असून यात माता व नवजात बालकांची प्रकृती अगदी ठणठणीत आहे. यामुळे धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची रुग्णांप्रती तत्पर सेवा दिसून येत आहे.
धानोरा आरोग्य केंद्र परिसरात दर्जेदार रुग्ण सेवा देण्यासाठी नावलौकिक आहे. हे आरोग्य केंद्र बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर एक प्रशस्त इमारत असून यात प्रसूती गृह, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया गृह, स्वच्छतागृह,पिण्यासाठी शुद्ध पाणी, प्रसूती साठी आलेल्या मातांना ऑक्सिजन आदी प्रकारच्या सुविधा याठिकाणी उपलब्ध आहेत. याठिकाणी आरोग्य कर्मचारी अगदी वेळेवर आपली चोख सेवा रुग्णांना देत असतात. यामुळे आरोग्य केंद्रात दररोज परिसरातील रुग्णाची वर्दळ दिसून येते.
दुर्धर आजारांवर औषोधोपचार
प्राथमिक आरोग्य केंद्र दैनंदिन दोन वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या सेवेसाठी तत्पर राहतात.विशेषतः यात एक महिला वैद्यकीय अधिकारी असल्याने याचा महिलांना मोठा फायदा होत आहे. आरोग्य केंद्रात ब्लडप्रेशर, डायबिटीस, कृष्ठरोग, टीबी आदी दुर्धर आजारांवर वेळोवेळी औषोधोपचार करून आरोग्य कर्मचारी प्रत्यक्ष रुग्णाच्या घरी जाऊन त्यांच्या आरोग्याची विचारपूस करीत असतात.
चार उपकेंद्र,आणि १७ गावांची जबाबदारी
धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत धानोरा,देवगाव,पंचक,बिडगाव असे चार उपकेंद्र सहित सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले कुंड्यापाणी,शेवरे,डुकर्णे,बढाई यासह अनेक आदीवासी पाडे , वस्त्यासह १७ गावांची जबाबदारी आरोग्य कर्मचाऱ्यावर आहे. यात सातपुडा पर्वतात असलेल्या गावे,पाडे,वस्त्या येथे भेटी देतांना डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.
आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा भडिमार
आरोग्य कर्मचाऱ्यांना रुग्णांची तपासणी करणे,औषधोपचार करणे,विविध शिबिरे घेणे,लसीकरण करणे ही सर्व कामे पार पाडत असताना सोबत कार्यालयीन कागदपत्रे व ऑनलाइनची कामे देखील यावेळत पूर्ण करावी लागतात यातही धानोरा आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका,लॅब टेक्निशियन, शिपाई अशी पदे रिक्त असून याचा ताण उपलब्ध कर्मचाऱ्यांवर येत असतो.
१०८ व १०२ ची २४तास सेवा
धानोरा आरोग्य केंद्रात प्रसूती झालेल्या महिलांची ने आण करण्यासाठी १०२ ही रुग्णवाहिका निरंतर सेवा बजावीत आहे. तसेच आरोग्य केंद्र हे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर असल्याने यावर दररोज लहान मोठे अपघात होत असतात अपघात ग्रस्ताना १०८ रुग्णवाहिकेत आरोग्य केंद्रात आणून प्रथोमोचार करून पुढील उपचारासाठी पाठविले जाते.