जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२१ । कोरोना महामारीच्या काळात परिचारिकांचे कार्य सुवर्णाक्षरांत नोंद व्हावे असे झाले आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या परिचारिकांचे वैद्यकीय सेवेतील योगदान खूप महत्वाचे आहे, असे प्रतिपादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी केले आहे.
परिचारिका सेवेला अत्याधुनिक स्वरूपात आणणाऱ्या लेखक, परिचारिका, संख्याशास्त्रज्ञ फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या जन्मदिनानिमित्त जागतिक परिचारिका दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोना प्रतिबंधत्वाचे नियम पाळून कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर फ्लोरेन्स नाइटिंगल यांच्या प्रतिमेला अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी माल्यार्पण केले.
यानंतर अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी मनोगत व्यक्त करीत रुग्णालयात सेवा देत असलेल्या परिचारिकांना सदिच्छा देत, निःस्वार्थपणे सेवा देत असल्याने रुग्णांच्या मनात आदराचे स्थान निर्माण होत असल्याचे सांगितले. यावेळी अधिसेविका कविता नेतकर यांनी परिचारिकांच्या सेवेविषयी माहिती दिली. विद्यार्थिनी परिचारिका दिव्या सोनवणे, किरण साळुंखे यांचा ऑक्सिजन नर्स म्हणून सेवा बजावत असल्याने अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्राचार्य अनिता भालेराव, सविता कुरकुरे, कविता पवार, राजश्री आडाळे, माने, त्रिमाळी, युगंधरा जोशी, रोजमेरी वळवी, छाया पाटील यांचाहि विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकीय उप अधीक्षक डॉ. संगीता गावित, अधिपरिचारिका जयश्री जोगी, योगिता पवार, नीला जोशी, अर्चना धिमते, संगीता शिंदे आदी उपस्थित होते.